कोंबड्याच्या आरवण्यामुळे झोपमोड झाल्याने महिलेची पोलिसांत तक्रार !


एके काळी कोंबडा आरवला, की ही दिवसाची सुरुवात समजली जात असे. कोंबडा आरवला, की घरातील मंडळी झोपेतून जागी होऊन आपापल्या कामाला लागत असत. मात्र पुण्यामध्ये आपल्या बहिणीकडे पाहुणी म्हणून आलेल्या महिलेची कोंबड्याच्या आरवण्याने झोपमोड झाली, आणि त्यामुळे संतापून जाऊन तही महिला चक्क पोलीस स्टेशनमध्ये कोंबड्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास जाऊन पोहोचली ! महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीअंतर्गत, कोंबड्याच्या आरवण्यामुळे आपली झोपमोड होत असून, त्यासाठी या कोंबड्याला शिक्षा करण्यात यावी असे निवेदन महिलेने लेखी रूपात पोलिसांकडे दिले आहे.

संबंधित महिला पुण्यातील सोमवार पेठेमध्ये रहात असलेल्या तिच्या बहिणीकडे काही दिवस राहण्यास आली असून, तिच्या बहिणीच्या घरासमोर एक कोंबडा दररोज आरवत असल्याने आपली झोपमोड होत असून,कोंबड्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिलेने पोलिसांकडे केली. याबाबत अधिक चौकशी केली असता, ‘आपली बहिण जरा तापट स्वभावाची असल्याने थोड्याशा आवाजानेही तिला त्रास होत असल्याचे’ संबंधित महिलेच्या बहिणीने म्हटले आहे. या महिलेने जरी पोलिसांकडे तक्रार केली असली, तरी पोलिसांनी कोंबड्यावर किंवा कोंबड्याच्या मालकावर अद्याप तरी कायदेशीर कारवाई केलेली नाही.

या पूर्वीही अशीच एक घटना मध्य प्रदेश राज्यातील शिवपुरी गावामध्ये घडली असून, या गावातील एक महिला, आपल्या मुलीला एका कोंबड्याने चोच मारली असल्याची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्यावेळी कोंबड्याच्या मालकिणीला पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात येऊन कोंबडा मोकाट न सोडण्याची ताकीद देण्यात आल्यानंतरच हे प्रकरण मिटले होते.

Leave a Comment