श्रीलंकेच्या हल्ल्ल्याची पाळेमुळे भारतापर्यंत


श्रीलंका हा भारताचा सख्खा शेजारी. पार रामायण काळापासून या देशाचे भारताशी जवळचे संबंध आहेत. मात्र अन्य सर्व देशांप्रमाणेच याही देशात दहशतवाद वाढत असून त्याची पाळेमुळे भारतापर्यंत पोचत आहेत. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.

श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या बॉम्बहल्ल्यामागे एनटीजे ही दहशतवादी संघटना होती. मात्र या संघटनेला प्रेरणा तमिळनाडूतील इस्लामी संघटनेने दिली असल्याचा आरोप एका बौद्ध साधूने केला आहे. त्यामुळे श्रीलंका-भारत संबंधात पुन्हा मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

कोलंबोतील हल्लेखोरांपैकी काही आत्मघातकी हल्लेखोरांनी प्रशिक्षण घेण्यासाठी किंवा अन्य परदेशी दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी काश्मीर आणि केरळचा दौरा केला होता, असे श्रीलंकेच्या सेनाध्यक्षांनी या महिन्याच्या सुरूवातीला म्हटले होते. त्यात या साधूच्या वक्तव्याची भर पडली आहे.

गालागोदाट्टे ज्ञानसारा असे या बौद्ध धर्मगुरुचे नाव आहे. त्यांना आधी तुरुंगात डांबण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची सुटका करण्यात आली. ज्ञानसारा यांना न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल गेल्या वर्षी सहा वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र अध्यक्ष सिरिसेना यांनी त्यांना माफी दिली होती. त्यानंतर त्यांनी ही पहिलीच पत्रकार परिषद घेतली होती. तमिळनाडु तौहीद जमात (टीएनटीजे) असे इस्लामी संघटनेचे नाव आहे. या संघटनेचे सदस्य असलेल्या अयुब आणि अबदी या दोघांनी श्रीलंकेचा दौरा केला होता. तेथे ते अब्दुल रझीक याला भेटले. बौद्धधर्मियांना मुस्लिमांविरुद्ध भडकावण्याचा त्यांचा विचार होता. म्हणून त्यांनी बुद्धविरोधी अपमानजनक संदेश पाठवले, असे ज्ञानसारा यांचे म्हणणे आहे.

श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी झालेल्या बॉम्बस्फोटांनी 300 पेक्षा अधिक लोकांचे प्राण घेतले होते. नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या संघटनेचा या हल्ल्यात हात असल्याचे श्रीलंका सरकारचे म्हणणे आहे. या स्फोटानंतर एनटीजे आणि टीएनटीजे यांचा संबंध असल्याचे बोलले गेले होते. मात्र एनटीजेशी आपला काही संबंध नसल्याचे या संघटनेचे सरचिटणीस ई. मोहम्मद यांनी स्पष्ट केले आहे. या संघटनेचे आठ लाख सदस्य आहेत. श्रीलंका तौहीद जमात (एसएलटीजे) ही आपली साथी संघटना आहे, असे या संघटनेने म्हटले होते.

“आमची संस्था 2004 मध्ये तमिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आली. लोकांना इस्लाममध्ये आमंत्रित करणे, गैर-मुसलमानांमधील इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करणे, कोणत्याही अन्यायाविरोधात लोकशाही पद्धतीने निषेधाचे आयोजन करणे आणि सामाजिक-धार्मिक उपक्रम घेणे, ही आमची चार प्रमुख कार्ये आहेत,” असे टीएनटीजे कर्नाटकचे राज्य अध्यक्ष शमसुल्लाह यांनी म्हटले होते.

हे दावे-प्रतिदावे एकीकडे केले जात असतानाच भारतातील गुप्तचर संस्थांनी टीएनटीजे आणि एसएलटीजे या दोन्ही संस्थांवर पाळत ठेवायला सुरूवात केली. श्रीलंकेतील घटनांनीह यापूर्वीही भारताला बेजार केले आहे आणि त्याची मोठी किंमत भारताला द्यावी लागली होती. एलटीटीईच्या दहशतवादाने थैमान घातले होते तेव्हा श्रीलंकेचे पंतप्रधान जयवर्धन यांनी एलटीटीईचे बंड शमविण्यासाठी 1984 मध्ये भारताला आमंत्रित केले होते. मग भारताचे पंतप्रधान राजीव गांधी कोलंबोला गेले आणि भारत-श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानुसार तमिळ बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी सैनिक पाठविण्यास भारताने संमती दिली. मात्र याच एलटीटीईला इंदिरा गांधी यांच्या काळापासून मदत देण्यात होती, याकडे राजीव गांधींनी दुर्लक्ष केले. त्या मोहिमेत भारतीय शांतिसेनेची मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. त्यात 1200 जवान हुतात्मे झाले आणि सुमारे 7000 जखमी झाले. दुसरीकडे एलटीटीईला भारतीय तमिळ जनतेकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. तमिळनाडूतील स्थानिक राजकारण्यांनीही एलटीटीईला मदत केली. चिडलेल्या एलटीटीईने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची भारतात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना हत्या केली होती. ही घटना घडली ती तमिळनाडूतच.

टीएनटी आणि एसएलटीजे या दोन संघटनांच्या जवळीकीमुळे तो इतिहास पुन्हा उगाळला जात आहे. त्याचा वेळीस बंदोबस्त करणे हेच भारताच्या हिताचे आहे.

Leave a Comment