राजकारणातील चिकाटीचा आदर्श -जगनमोहन रेड्डी


गेल्या आठवड्यात 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी चंद्राबाबू नायडूंपासून ममता बॅनर्जीपर्यंतचे नेते सगळ्या नेत्यांना एकत्र घेऊन केंद्रात सरकार रचण्याचे स्वप्न पाहत होते. त्यासाठी खलबते करून पुढील शक्यता अजमावत होते. त्यावेळी एक नेता त्या सर्वांवर हसत होता. कारण केंद्रातील सत्ता सोडा, चंद्राबाबू नायडूंच्या हातात असलेली राज्यातील सत्ताही गेली. ती सत्ता हिसकावणारा आणि त्यांच्यावर हसणारा तो नेता होता जगनमोहन रेड्डी. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे चिरंजीव.

चिकाटीने राजकारण केले तर कसे यश साध्य केले जाऊ शकते, याचा एक आदर्शच जगनमोहन यांनी घालून दिला आहे. जगनमोहनना रोखण्यासाठी केंद्रातील आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि नंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम सरकारने जंग जंग पछाडले. मात्र अखेर सुमारे तब्बल दशकभराच्या लढ्यानंतर जगनमोहन यांनी सत्ता काबिज केली आणि आज काँग्रेस व तेलुगु देसम हे दोघेही सत्तेबाहेर गेले आहेत.

लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश विधानसभेचीही निवडणूक होती. या निवडणुकीत नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षाला 175 पैकी केवळ 23 जागा मिळाल्या. तर त्यांच्यासमोर नवख्या मानल्या गेलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने 151 जागा मिळवून निर्विवाद यश मिळविले.

आंध्र प्रदेशाचे 2014 मध्ये विभाजन झाले आणि तेलंगाणा या राज्याचा जन्म झाला. आंध्र प्रदेश जनता विभाजनाच्या विरोधात होती आणि आजही आहे. नायडू यांनी गेल्या वेळेस शेवटच्या मिनिटाला भाजप व जनसेना या पक्षांशी युती केली आणि वायएसआर काँग्रेसचा पराभव केला. नव्या आंध्रच्या विधानसभेत नायडू यांनी 102 जागा मिळवल्या तर वायएसआरला 67 जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत 25 पैकी 15 जागा मिळविल्या होत्या. वायएसआर काँग्रेसला लोकसभेच्या 8 जागा मिळाल्या होत्या. आज चित्र संपूर्ण पालटले आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळेस चंद्राबाबूंनी वायएसआर काँग्रेसच्या 23 आमदारांना एका रात्रीत विकत घेतले होते. आज त्याच पक्षाचे केवळ 23 आमदार निवडून आले आहेत, हा काव्यगत न्याय म्हटला पाहिजे.

जगनमोहन यांचा विजय देशासाठी भलेही आश्चर्यकारक असेल, मात्र आंध्र प्रदेशासाठी तो तसा नाही. अवघ्या 46 वर्षांच्या येदुगुरी सांदिनती जगनमोहन रेड्डी यांनी इथपर्यंत येण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.

जगनमोहन यांचे वडील 2009 मध्ये तत्कालीन आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. साहजिकच ते स्वतःही काँग्रेसमध्ये होते. मात्र निवडणुकीनंतर लवकरच हेलिकॉप्टर अपघातात राजशेखर यांचे निधन झाले. त्यानंतर जगनमोहन यांचे दिवस फिरले.

जगनमोहन यांनी उचललेली काही राजकीय पावले सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला आवडली नाहीत. राजशेखर रेड्डी यांचे राजकीय वारस होण्याची जगनमोहन यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु कॉंग्रेसने ती यशस्वी होऊ दिली नाही. जगनमोहन यांनी कॉंग्रेसविरोधात उघड बंड पुकारले आणि काँग्रेसनेही त्यांना राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूत करण्याचा जणू विडाच उचलला. बेहिशेबी संपत्ती जमा केल्याच्या आरोपावरून त्यांनी सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले. तेथे ते 16 महिने होते.

अखेर डिसेंबर 2010 मध्ये त्यांनी युवजन श्रमिक रयतु काँग्रेस (वायआरएस) या नव्या पक्षाची स्थापना केली. त्याच वेळेस आंध्र प्रदेशातून काँग्रेसची सत्ता उखडण्याचाही त्यांनी निश्चय केला.

एखाद्या नव्या नेत्याने काँग्रेससमोर शरणागती पत्करली असती. मात्र जगन यांनी तुरुंगात जाणे पसंत केले आणि युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. तेलंगाणाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला तेव्हा जगनमोहन तुरुंगात होते. तेथेच त्यांनी उपोषण सुरू करून आपली राजकीय सक्रियता कायम ठेवली.

मागच्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळविले आणि जगनमोहननी 2019च्या निवडणुकीची तयारी 2014 मध्येच सुरू केली. त्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा केला. एकूण 13 जिल्ह्यांतील 125 विधानसभा मतदारसंघात त्यांनी 450 दिवसांची पदयात्रा केली. याच दरम्यान त्यांनी दर शुक्रवारी सीबीआयसमोर हजेरी द्यावी लागत असे. त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले. मात्र त्याला तोंड देत त्यांनी आपला निर्धार कायम ठेवला.

आंध्र प्रदेशच्या पाच कोटी जनतेचा विश्वास जगनमोहननी जिंकला. नव्या सरकारसमोर असलेली आव्हाने त्यांच्या समोरही आहेत. मात्र सत्ताधारी भाजपसोबत त्यांचे संबंध चांगले आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. एकुणात राजकीय भूमिकेत सातत्य राखले आणि अविरत कष्ट केले तर काय साध्य केले जाऊ शकते, हे जगनमोहन यांच्या निमित्ताने दिसून आले आहे.

Leave a Comment