जागतिक सुरक्षेला धोका ठरलेले ‘लोन वोल्व्ह्ज’


सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग मानल जाते आणि एकविसावे शतक हे विज्ञानाच्या प्रगतीचे मानले जाते. माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान यांचा व्याप वाढला आहे आणि विज्ञानाच्या आजपर्यंतच्या प्रगतीला मागे टाकून नवी क्षितिजे गाठली जात आहेत. सुरूवातीला विज्ञानाची ही प्रगती औद्योगिक उत्पादन, औषध निर्मिती अशा क्षेत्रांपुरती मर्यादित असतील असा समज होता. मात्र नंतर ही प्रगती शस्त्रास्त्रे आणि हिंसेच्या क्षेत्रातही झाली. त्यातूनच अत्यंत घातक अशी शस्त्रे माणसाच्या हाती आली. या शस्त्रांच्या बळावर दहशतवादी हल्ले करण्याचे तंत्र विकसित झाले. त्यांच्या विरोधात प्रत्येक देशातील सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली. आता यावरही एक हुकूमी अस्त्र निर्माण झाले असून त्याचे नाव आहे लोन वोल्फ अर्थात एकाकी लांडगा किंवा एकटा हल्लेखोर.

मार्च महिन्यात न्यूझिलंडमध्ये ख्राईस्टचर्च येथे एका मशिदीवर हल्ला करण्यात आला. देशातील वाढत्या लोकसंख्येच्या विरोधात चीडलेल्या एका ख्रिस्ती माथेफिरूने हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. त्याचा बदला म्हणून श्रीलंकेत कोलंबो येथे ईस्टर संडेच्या दिवशी चर्चमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे पोलिसांनी एका व्यक्तीची धरपकड केली. कोलंबोतील बॉम्बस्फोटाच्या विरोधात मुस्लिमांना मारण्याचा बेत या व्यक्तीने केला होता, मात्र पोलिसांनी तो उधळून लावले. या हल्ल्यांच्या मागे कोणतीही दहशतवादी संघटना नव्हती. ही सर्व कृत्ये लोन वोल्फ म्हणजे एकट्या हल्लेखोरांची होती. येत्या काळात असे हल्ले वाढतील, अशी शक्यता जगभरातील सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

हे एकटे हल्लेखोर दहशतवादी संघटनांचे साहित्य वाचून हिंसेसाठी सज्ज होतात. एकेकट्याने काम करत असल्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणे अवघड असते. त्यामुळे विविध देशांसाठी ते एक मोठी डोकेदुखी ठरले आहेत. परंतु त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे अशा लोन वोल्व्ह्जची निर्मिती करून त्यांच्या मार्फत आपले ईप्सित साध्य करून घेण्याचे एक तंत्र विकसित झाले आहे.

आतापर्यंत वैज्ञानिक प्रयोगांची एक ठराविक पद्धत होती. कोणतेही नवे औषध तयार केले जाताना त्या औषधाचे प्रयोग आधी उंदीर, बेडूक किंवा ससे यांच्यावर केले जायचे. प्रयोगशाळेतील नियंत्रित वातावरणात त्यांना निरनिराळी रसायने देवून त्यांच्या मेंदूवर काय परिणाम होतो आहे हे बघितले जायचे. सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर त्यांचा उपयोग मानवांसाठी केला जायचा.

त्याच प्रमाणे विकसित देशांनी एक नवीन पद्धत काढली असून त्यात उंदरांसारखेच माणसांना प्रयोगशाळेसारख्या नियंत्रित वातावरणात वाढवले जाते आणि जेथे घातपात घडवायचा तेथे पाठवून विध्वंस घडवला जातो. अनेक अमेरिकी विद्यापीठांत असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर होत आहेत. गेल्या वीस वर्षांत जगात असे दहा हजारांपेक्षा अधिक हल्लेखोर पाठवले गेले आहेत, असे म्हटले जाते.

विशेषतः ज्या देशांमध्ये आपसात महासत्ता होण्याची स्पर्धा आहे, त्या देशांमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोणत्याही देशाला महासत्ता होण्यासाठी अन्य देशांवर आपले वर्चस्व वाढवावे लागते. हे नियंत्रण फक्त चांगले परराष्ट्र संबंध, आर्थिक सहकार, औद्योगिक व्यापार आणि सांस्कृतिक संबंध यांच्या माध्यमातून नाही होत. तर बळकट होऊ पाहणाऱ्या देशाला सतत अस्वस्थ ठेवण्यातून ते साध्य केले जाते. कोणत्याही देशाला स्वस्थ झोपू न देणे हे त्यांचे उद्दिष्टच असते. खासकरून भारतासारख्या 60-70 वर्षांपूर्वी स्वतंत्र झालेल्या आणि विकसनशील असलेल्या देशांना याचा भयानक त्रास होतो.

ट्रेव्हर आरोन्सन नावाच्या अमेरिकी पत्रकार-लेखकाने या विषयावर एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे शीर्षकच ‘टेरर फॅक्टरी’ असे आहे. न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 2001 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर अमेरिकेने दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले. त्यासाठी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) 15 हजार खबऱ्यांचे एक जाळे उभारले. दहशतवादाविरोधात कारवायांसाठी या खबऱ्यांचा वापर करण्यात येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात यातील अधिकांश लोक गुन्हेगार आणि ठग होते, असे या पुस्तकात दाखवून दिले आहे. या खबऱ्यांनी मुस्लिम समुदायात प्रवेश करायचा आणि दहशतवादी कट शिजवायचे. नंतर ते कट उधळून एफबीआयने दहशतवादाविरोधात यश मिळाल्याचा दावा करायचा, अशा प्रकारची ही कार्यपद्धती होती. यासाठी एफबीआय दरवर्षी 3 अब्ज डॉलर खर्च करते.

अमेरिकाच नव्हे तर चीन व रशियासारखे देशही हेच तंत्र वापरतात, फक्त त्यांची चर्चा होत नाही एवढेच. दहशतवादी संघटनांशी एक वेळ लढणे सोपे, परंतु अशा एकट्या हल्लेखोरांना रोखणे प्रचंड अवघड आहे. म्हणूनच ‘लोन वोल्व्ह्ज’ हे सध्याच्या जागतिक सुरक्षेला धोका ठरले आहेत.

Leave a Comment