काँग्रेस – दिशाहीन आणि उद्देशहीन पक्ष


एखाद्या पक्षाला निवडणुकीत सपाटून मार बसला आणि पक्षाची पूर्ण वाताहत झाली तर पक्षात आरोप-प्रत्यारोप होणे अत्यंत स्वाभाविक आहे. आज सत्तेत शानदारपणे पुनरागमन केलेल्या भारतीय जनता पक्षालाही 2004 मध्ये हा प्रकार अनुभवायला मिळाला होता. पराभव झाल्याच्या काही दिवसांतच स्मृती इराणींसारख्या स्वपक्षीय नेत्यांपासून रामविलास पासवान यांच्यासारख्या सहकारी पक्षाच्या नेत्यांपर्यंत सर्वांनी नरेंद्र मोदी यांना त्या पराभवासाठी जबाबदार ठरविले होते. गुजरात दंगलीमुळे मोदी यांच्या डागाळलेल्या प्रतिमेमुळेच तो पराभव झाल्याचे बोलले जात होते. यथावकाश भाजप त्या गोंधळातून सावरला आणि आज तो सर्वात मोठा पक्ष बनला आहे.

काँग्रेसच्या शिबिरात मात्र हा गोंधळ पाच वर्षे झाला तरी दूर झालेला दिसत नाही. मागील सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेस पक्षाचा अपेक्षित पराभव झाला. त्यातून पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करून पुढील वाटचाल होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. म्हणूनच सलग दुसऱ्यांचा काँग्रेसला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यातून नवे वादविवाद निर्माण झाले आहेत आणि एकमेकांवर दोषारोप केले जात आहेत.

लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा जसा अमेठी मतदार संघात पराभव झाला तसाच काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनाही हार पत्करावी लागली. गेल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासहित काँग्रेसच्या आठ माजी मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव झाला. यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण, अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नबाम टुकी यांचा समावेश आहे. यावरून पक्षाची किती धूळधाण उडाली, हे लक्षात येऊ शकते.

तसेच काँग्रेसला 18 राज्यांमध्ये एकही जागा मिळालेली नाही आणि स्वतः राहुल गांधी हे आपल्या परंपरागत अमेठी मतदारसंघातून पराभूत झाले. लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही. या पराभवामुळे राजस्थान व कर्नाटकसारख्या राज्यात बंडाचे स्वर उमटू लागले आहेत.

आमच्या पक्षाच्या नेत्यांनी पक्षापेक्षा आपल्या मुलांना निवडून आणण्यास प्राथमिकता दिली, असा आरोप खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी करून या बेबनावात भर टाकली आहे. पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी काँग्रेस कार्यसमितीची बैठक शनिवारी झाली. यात राहुल यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आणि इतर नेत्यांनी त्यांना परावृत्त केले, हा भाग आतापर्यंत समोर आला आहे. मात्र राहुल यांनी खरोखरच राजीनाम्याची तयारी दाखवली का, हाही प्रश्नच आहे. कारण तसे काही झाले नसल्याचाही दावा काही जणांनी केला आहे. याच बैठकीत त्यांनी पक्षाच्या तीन मोठ्या नेत्यांवर निशाणा साधला. या नेत्यांनी पक्षापेक्षा मुलांना प्राधान्य दिले, असे ते म्हणाल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी लढण्यासाठी पक्षाने मला एकटे टाकले, अशी तक्रार केल्याचेही प्रसिद्ध झाले आहे.

निवडणुकीपूर्वीही असाच गोंधळ काँग्रेसने घातला. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात युती होणार का नाही, यावरून शेवटपर्यंत भवती न भवती चालू होती. अखेर तिथे सातही जागांवर भाजपने पुन्हा विजय मिळवला. प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवणार का, यावरूनही गोंधळाचेच वातावरण होते. त्यातून भाजपला आयते कोलित मिळाले. ‘नेहरू गांधी’ कुटुंबाचे नाव ही एकेकाळी काँग्रेसची जमेची बाजू होती, ती आता जोखमीची ठरू लागली आहे. ‘कारवां’ नियतकालिकाचे संपादक हरतोषसिंह बल यांनी तर म्हटले आहे, की “काँग्रेसचे अस्तित्त्व जितका काळ राहील तेवढे ते भाजपच्या फायद्याचे ठरेल.” आपल्याला काय करायचे आहे हेच जणू कांग्रेसला कळत नाही.

खरे म्हणजे वंशवाद आणि ‘जी हजूरी’ संस्कृतीने काँग्रेसला या पातळीवर आणून ठेवले आहे. वर्ष 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला तेव्हा सोनिया गांधींनी अध्यक्षपदाचा आणि राहुलनी उपाध्यक्षपदाचा असाच राजीनामा देऊ केला होता. तेव्हाही कार्यसमितीने तो फेटाळून लावला होता. दरबारी राजकारण्यांनी सामुहिक जबाबदारीची भाषा करत त्यांच्यावर जबाबदारी टाकणे टाळले होते. मात्र त्यानंतर त्यांनी पक्षासाठी काही केलेही नाही. त्यामुळेच आजच्या दयनीय स्थितीला हा पक्ष आला आहे. जोपर्यंत आपला उद्देश या पक्षाला कळून येत नाही तोपर्यंत काही खरे नाही.

Leave a Comment