बर्गर खाण्याचा किती हा सोस !


प्रत्येकाच्या खानपानाच्या आवडीनिवडी निरनिराळ्या असतात, आणि या आवडींमध्येही एक पदार्थ असा असतो, की हा पदार्थ खाण्यास मिळावा यासाठी किती ही दूर पर्यंत प्रवास करण्याची, तो पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत कितीही वेळ वाट पाहण्याची, काहींची तयारी असते. मात्र जीवावर बेतले असतानाही कठीण परिस्थितीतून पार होताक्षणी जर सर्वात आधी डोळ्यांसमोर आपला आवडता खाद्यपदार्थ येत असेल, तर मात्र ही व्यक्ती जातीची खवय्या म्हटली पाहिजे. या महिलेची कथा देखील अशीच काहीशी आहे.

घटना आहे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातली. येथील निवासी असणाऱ्याएका गर्भवती महिलेला अचानक आपला आवडता बर्गर खाण्याची इच्छा झाली. पती-पत्नी दोघे बर्गर खाण्यासाठी बाहेर पडले. क्रॉयडन भागातील मॅकडोनाल्ड्स आउटलेटच्या आवारात पोहोचत असताना अचानक महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. पत्नीची प्रसूती आता कोणत्याही वेळी होऊ शकते हे लक्षात येऊन महिलेच्या पतीने त्वरित फोन करून अँब्युलन्स बोलावून घेतली. मात्र अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी महिलेची प्रसूती झाली.

जीवावर बेतलेल्या प्रसंगातून सुटका होताच महिलेने त्वरित आपल्या पतीला बर्गरची आठवण करून देऊन बर्गर आणून देण्यास सांगितले. पतीही महिलेची विनंती मान्य करीत मॅकडॉनाल्ड्स मध्ये पोहोचला असता, त्याचा एकंदर अवतार पाहून तेथील कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, त्याने ही आपल्या पत्नीची नुकतीच गाडीमधेच प्रसूती झाली असून तिला बर्गर खाण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनीही वेळ न दवडता महिलेला प्राथमिक मदत देऊ करून तिचा आवडता बर्गर विनाविलंब तयार करून दिला. एव्हाना अँब्युलन्स ही तिथे येऊन पोहोचली होती. पण अँब्युलन्समधून आपल्या नवजात अर्भकाच्या सोबत रुग्णालयात जाण्यापूर्वी महिलेने आपल्या आवडत्या बर्गरवर मनसोक्त ताव मारला, आणि त्यानंतरच संपूर्ण कुटुंब रुग्णालयाकडे रवाना झाले.

Leave a Comment