रस्त्यावरील मॅनहोलमधून अचानक फेस येऊ लागतो तेव्हा…


चीनमधील शियान प्रांतामध्ये एका रस्त्यावर असेलल्या तीन मॅनहोल्सअधून अचानक पांढरा फेस उसळू लागला आणि पाहता पाहता सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंतचा हा रस्ता पांढऱ्या फेसाखाली अक्षरशः झाकून गेला. अशा पद्धतीने हा फेस मॅनहोल्सच्या बाहेर पडून रस्ताभर पसरत चाललेला पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे भीतीने धाबे दणाणले. ‘शांघाईस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार मॅनहोलच्या खाली असलेल्या ड्रेनेज पाईप्स मधून हा पांढरा फेस बाहेर पडला आणि संपूर्ण रस्ताभर पसरू लागला आणि पाहता पाहता पांढऱ्या फेसाने संपूर्ण रस्ता भरून वाहू लागला. या घटनेचा व्हिडियो चीनी सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, इतका फेस कशामुळे उत्पन्न झाला असावा या बद्दल अनेक तर्कवितर्क सुरु होते.

दरम्यान या फेस या ड्रेनेज पाईप्समध्ये कसा तयार झाला आणि मॅनहोल्समधून बाहेर येऊन रस्ताभर कसा पसरला हे न उकललेले गूढ वाटू लागले असून, हा फेस साफ करीत असतानाच मॅनहोल्समधून अधिकाधिक फेस बाहेर पडत राहिल्याने, नेमके काय घडते आहे हे सफाई कर्मचाऱ्यांनाही कळेनासे झाले. अखेर संध्याकाळ पर्यंत संपूर्ण रस्त्यावरून फेस हटविण्यात सफाई कर्मचाऱ्यांना यश आले.

ही घटना घडून गेल्यानंतर काही काळाने हा फेस कशामुळे उत्पन्न झाला असावा याचे निश्चित कारण सांगणारे विधान स्थानिक प्रशासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले. झाले असे, की स्थानिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या मेट्रोसाठीच्या बोगद्यांचे बांधकाम सुरु असून, त्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या एका पदार्थामुळे हा फेस तयार झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पदार्थाची काही प्रमाणात गळती ड्रेनेजमध्ये झाल्याने ड्रेनेज पाईप्सच्या माध्यमातून मॅनहोल्समधून पांढरा फेस बाहेर पडला असल्याचे सांगितले गेले. हा फेस कोणत्याही वस्तू किंवा मनुष्यांसाठी व प्राण्यांसाठी हानिकारक नसून, नागरिकांनी यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचे निवेदनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment