फ्रांसमध्ये लवकरच खुले होत आहे ‘अल्झायमर्स व्हिलेज’


दक्षिण-पश्चिमी फ्रांसच्या ‘दाक’प्रांतामध्ये सध्या एका आगळा प्रकल्प विकसित केला जात असून, या ठिकाणी खास अल्झायमर्सच्या रुग्णांसाठी ‘अल्झायमर्स व्हिलेज’ निर्माण केले जात आहे. या ठिकाणी राहणाऱ्या अल्झायमर्सच्या रुग्णांना मोकळ्या वातावरणामध्ये राहण्याचा आनंद घेता येणार असून, त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेचीही योग्य काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे. असा प्रकल्प सध्या नेदरलँड्स येथे आधीपासूनच सुरु झाला असून, या प्रकल्पावरून प्रेरणा घेत ‘अल्झायमर्स व्हिलेज’चे निर्माण करण्यात येत आहे.

मेंदूच्या पेशी निकामी होऊ लागल्याने दिवसभरातील नित्याची लहान लहान कामे देखील करण्यात येत असणारी अडचण इथपासून सुरु झालेला हा विकार अखेर संपूर्ण स्मृतीभ्रंशापर्यंत जाऊन पोहोचतो. अशा वेळी काही आठवत नसल्यामुळे हे रुग्ण नेहमीच गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये दिसतात. अगदी दात घासण्यापासून ते जेवण्यापर्यंतची दैनंदिन कामे कशी करायची याचाही विसर या रुग्णांना पडू लागतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा विकार संपूर्ण बरा होईल असे औषधोपचार अजून तरी उपलब्ध नाहीत. हा आजार वाढत जाणारा असल्यामुळे बहुतेकवेळा या रुग्णांचे आयुष्य एखाद्या रुग्णालयातील एका लहानशा खोलीपुरतेच मर्यादित असते. तसेच यांना आपण कुठे जातो आहोत याचा विसर पडत असल्याने या रुग्णांना बाहेर पडून देणेही धोक्याचे ठरू शकते.

मात्र या रुग्णांनाही मनमोकळे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘अल्झायमर्स व्हिलेज’चे निर्माण केले जात आहे. या ठिकाणी रुग्णांना राहण्यासाठी स्वतंत्र निवासस्थाने, सुपरमार्केट्स, ब्युटी पार्लर्स, वाचनालय, व्यायामशाळा, फिरण्यासाठी सुंदर बगीचे इत्यादी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ‘व्हिलेज’च्या बाहेर हे रुग्ण एकट्याने जाऊ नयेत याची खबरदारी घेण्याच्या आणि रुग्णांची देखभाल करण्याच्या कामी प्रशिक्षित परिचारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रुग्णांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असून ही जबाबदारी अनेक स्वयंसेवी संस्थांनी घेतली आहे. अल्झायमर्स व्हिलेजचे निर्माणकार्य सध्या सुरु असून, या वर्षाखेरीला हे व्हिलेज, अल्झायमर्सच्या रुग्णांसाठी खुले केले जाणे अपेक्षित आहे.

Leave a Comment