‘हॅरी पॉटर’च्या चष्म्याचा लवकरच लिलाव


एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने वापरलेली एखादी वस्तू आपल्या संग्रही असणे, हे मानाचे लक्षण समजले जात असते. त्यामुळे प्राचीन काळी एखाद्या राजा-महाराजाने, महाराणीने वापरलेले दागिने, वस्त्रे, प्राचीन नाणी, पेंटींग्ज, शस्त्रे इत्यादींचा संग्रह करण्यासाठी खासगी संग्राहक मोठ्या किंमतीला या वस्तू लिलावाच्या माध्यमातून खरेदी करीत असतात. आताच्या काळामध्ये प्रसिद्ध व्यक्तींनी वापरलेल्या वस्तू आपल्या संग्रही असणे हे एका अर्थी ‘स्टेटस सिम्बॉल’ देखील झाले असल्याने असल्या वस्तूंच्या लिलावामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करून लोक या वस्तू खरेदी करीत असतात. बरे, या वस्तु म्हणाव्या तशा खासही नसतात, पण वस्तू सर्वसामान्य असली, तरी ती एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने वापरली, म्हणून त्यासाठी भरपूर किंमत मोजणारी हौशी मंडळी आपल्याकडे अनेक आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक मायकल जॅक्सन जेव्हा भारतात, मुंबईमध्ये शो करण्यासाठी आला होता, तेव्हा तो ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता, तेथील आलिशान सुईटमध्ये रहात असताना झोपण्यासाठी जी उशी मायकलने वापरली होती, त्या उशीच्या अभ्र्याचा देखील लिलाव करण्यात येऊन, भरघोस किंमतीला हा अभ्रा विकला गेला होता ! असेच काहीसे आता ‘हॅरी पॉटर’च्या चष्म्याच्या बाबतीत होताना पहावयास मिळत आहे.

गोलाकार फ्रेमचा चष्मा, डोक्यावर जन्मखूण म्हणून ओळखला जाणारा एक मोठा व्रण, आणि हातामध्ये जादूची छडी, असे वर्णन केले, की आपल्या डोळ्यांसमोर हॅरी पॉटर उभा राहतो. ‘हॅरी पॉटर’ च्या पुस्तकांच्या आणि अर्थातच चित्रपटांच्या मालिकेने लहानांसोबत मोठ्यांनाही भुरळ घातली. याच हॅरी पॉटरचे पात्र पडद्यावर साकारणाऱ्या अभिनेता डॅनियल रॅडक्लिफने परिधान केलेल्या चष्म्याचा लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव ऑनलाईन करण्यात येत असून, ‘EwbankAuctions.com’ या वेबसाईटवर या चष्म्याचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावामध्ये या चष्म्याची किंमत सध्या तीन हजार ते पाच हजार पौंड्सच्या मध्ये आहे. जसजशी बोली वाढत जाईल तसतशी ही किंमतही अर्थातच वाढत जाणार आहे.

हा चष्मा चांदीच्या पातळ तारेचा बनला असून, डॅनियलने हा चष्मा ‘ हॅरी पॉटर अँड द फिलोसॉफर्स स्टोन’ या चित्रपटामध्ये परिधान केला होता. या चष्म्याला गोलाकार, ‘क्लियर’ लेन्सेस असून, या फ्रेमला काळ्या रंगाची बारीक किनार आहे. या फ्रेमच्या डाव्याबाजूला ‘मेड इन इंग्लंड’ अशी अक्षरे अंकित असून, उजव्या बाजूला ’40 20 135′ हे अंक कोरलेले आहेत. हॅरी पॉटरची भूमिका करीत असताना अगदी सुरुवातीच्या काळामध्ये डॅनियलने हा चष्मा वापरला होता.

Leave a Comment