‘पालकांच्या या निर्णयाचा यशात मोठा वाटा’, म्हणतात बिल गेट्स


बिल गेट्स हे व्यक्तिमत्व आज केवळ अमेरिकेत नाही, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे. एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी बिल गेट्स यांच्या आयुष्यातील अनेक घटक अतिशय महत्वाचे ठरले आहेत. यामध्ये त्यांच्या पालकांनी त्यांना दिलेले संस्कार आणि त्यांच्या बाबतीत घेतलेले काही निर्णय, हा घटकही आपल्या यशस्वी वाटचालीसाठी महत्वाचा असल्याचे गेट्स म्हणतात. बिल यांचे आईवडील, मेरी आणि विलियम गेट्स, हे चौकटीबाहेर विचार करणारे पालक असून, त्यांनी नेहमीच आपल्याला प्रोत्साहन दिल्याने, आपण नक्कीच काही तरी मोठे करुन दाखवू शकू असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण झाल्याचे बिल गेट्स म्हणतात.

यश, धनदौलत कितीही मिळाली असली, तरी ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हे कधीही न विसरण्याची शिकवण बिल गेट्स यांना त्यांच्या पालकांनी दिली. किंबहुना बिल लहान असल्यापासूनच समाजसेवी कार्यांमध्ये, गरजूंना मदत करण्याच्या निरनिराळ्या उपक्रमांमध्ये त्यांचे पालक त्यांना आवर्जून सहभागी करून घेत असत. हेच संस्कार आजही बिल यांच्यासाठी महत्वाचे असून, आजच्या काळामध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ या संस्थेचे कार्य केवळ अमेरिकेमध्ये नाही तर जगभरामध्ये सुरु आहे. जगभरामध्ये मागासलेल्या भागांमध्ये आरोग्यासेवा, शिक्षणसेवा आणि उपजीविकेसाठी निरनिराळी साधने पुरविण्याचे काम ही संस्था करीत असते. बिलचे आयुष्य लहानपणापासूनच अतिशय साधे होते. त्यात कसलाही भपका, ऐट नव्हती. म्हणूनच आज जगातील काही मोजक्या अब्जाधीशांपैकी एक असलेले बिल गेट्स, बर्गर खरेदी करण्यासाठी सर्वसामन्यांच्या प्रमाणेच रांगेमध्ये उभे असलेले अनेकदा पहावयास मिळतात.
मुले मोठी होऊ लागली की त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यात पालकांनी घातलेला मोडता, त्यावरून होणारे वाद ही घरोघरची कथा असतानाच, बिलच्या पालकांनी त्यांना नेहमीच स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य दिले. किंबहुना सरकारी शाळांच्या नियमबध्द चाकोरीमध्ये बिलला न अडकवता, त्यांच्या पालकांनी त्यांना त्या काळी खासगी शाळेमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. या शाळांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला महत्व अधिक होते. याच शाळेमध्ये बिलची संगणकाशी प्रथम ओळख झाली. बिलची संगणकशास्त्रातील रुची ओळखून, बिलला वयाच्या तेराव्या वर्षी संगणकशास्त्राचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन येथे रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी बिलच्या पालकांनी दिली. हायस्कूलमध्ये शिकत असताना बिल गेट्स यांनी दक्षिण वॉशिंग्टन येथे असलेल्या एका पावर प्लांटमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करण्याची संधी चालून आली असता, एक वर्षासाठी शालेय शिक्षणातून रजा घेऊन ही नोकरी पत्करण्याचे ठरविले असता, याही निर्णयाला बिलच्या पालकांनी त्यांना मनापासून पाठींबा दिला.

हार्वर्ड विद्यापीठामध्ये पदवी मिळविण्यासाठी शिकत असताना, बिल गेट्स यांनी शिक्षण अर्धवट सोडून देऊन न्यू मेक्सिको येथे स्थलांतर केले, आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली. बिलने शिक्षण अर्धवट सोडण्याचा घेतलेला निर्णय भविष्यामध्ये भोवणार की काय असे वाटून बिलचे पालक काहीसे चिंतीत नक्कीच झाले, पण त्यांनी आपली चिंता बिलसमोर कधीही व्यक्त न करता त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मनापासून पाठिंबा दिला. बिलच्या आयुष्यात अनेक प्रसंग असे ही आले, ज्यावेळी एखादे काम आपल्याला कधीच जमणार नाही असे वाटून बिल निराश होत. मात्र केवळ जमत नाही, म्हणून एखाद्या कामाचा नाद न सोडता जिद्दीने प्रयत्न करीत राहिले तर एक ना एक दिवस ते काम सहज साध्य होत असते हा विश्वास बिलच्या मनामध्ये त्यांच्या पालकांनीच उत्पन्न केला होता. या विश्वासाचा फायदा आपल्याला भविष्यामध्ये आपल्या व्यवसायात अनेकदा झाल्याचे बिल म्हणतात. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट उत्तमच करता आली पाहिजे असे नाही, किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम यश मिळवता आलेच पाहिजे हे आवश्यक नसून, आपल्याला सहज साध्य न होणारी गोष्ट आपण अर्धवट न सोडता प्रयत्नपूर्वक पूर्ण केली, ही भावना जास्त महत्वाची असल्याचे बिल म्हणतात, आणि हेच त्यांच्या यशाचे कारण आहे.

Leave a Comment