अॅमेझॉन पासून स्टारबक्स पर्यंत सर्वांना या महिलांचे पर्यावरण संरक्षणाचे धडे


१७३० साली जोधपूरचे तत्कालीन शासक महाराजा अभय सिंह यांनी स्वतःसाठी नवा किल्ला बांधण्याचे ठरविले. जिथे महाराजांना किल्ला बांधायचा होता, त्या जमिनीवर ‘खेजरी’ झाडांचे जंगल होते. पण किल्ला बांधायचा, तर जंगल कापून जमीन मोकळी करणेही आवश्यक असल्याने महाराजांचे सैनिक हाती कुऱ्हाडी घेऊन झाडे पाडायला आले. सैनिक झाडे पाडण्यास आले हे पाहताच गावातील बिष्णोई समाजातील अमृता देवी नामक एक महिला झाडांना मिठी घालून उभी राहिली. तिच्या प्रमाणेच तिच्या तिघी मुलीही झाडांना मिठी घालून उभ्या राहिल्या. चौघींचे म्हणणे एकच ,’सर संते रुख रहे, तो भी सस्तो जान’ ( ‘आमच्या मरण्याने एक झाड वाचत असले, तर आमचे मरणे व्यर्थ नाही’! ) अमृता देवी आणि तिच्या तिघीही मुली झाडांना बिलगून उभ्या राहिल्या, पण त्यांच्या विनविण्यांचा राजाच्या सैनिकांवर काही परिणाम झाला नाही. सैनिकांनी झाडांवर घाव घातले, झाडे गेली, आणि अमृता व तिच्या तिघी मुलीही ! या चौघींच्या मृत्यूने संपूर्ण बिष्णोई समाजामध्ये संतापाची एकाच लाट उसळली. त्यांनीही सैनिकांना झाडे पाडण्यास विरोध केला, आणि परिणामी असंख्य बिष्णोई मारले गेले. हीच घटना इतिहासामध्ये ‘खेजरली हत्याकांड’ म्हणून ओळखली गेली आणि याच घटनेने ऐतिहासिक ‘चिपको आंदोलनाची सुरुवात झाली.

पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत महिलांचा सहभाग हा त्या काळापासूनच उल्लेखनीय आहे. आजच्या काळामध्ये देखील निरनिराळ्या उपायांचा अवलंब करून पर्यावरण संरक्षणासंबंधी निरनिराळे उपक्रम राबविले जाण्यात महिला आघाडीवर आहेत. याचे उदाहरण म्हणजे अठरा वर्षीय गर्विता गुल्हाटी. वयाच्या पंधराव्या वर्षीच पर्यावरण संरक्षणासाठी काही तरी करण्याची इच्छा गर्विताच्या मनामध्ये घर करून होती. हॉटेल व्यवसायामध्ये नित्याने मोठ्या प्रमाणावर केला जाणारा पाण्याचा अपव्यय ती पहात होती. हा अपव्यय रोखण्यासाठी गर्विताने ‘व्हाय-वेस्ट’ कॅम्पेनची सुरुवात केली. हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंट्स मध्ये पाण्याचा अपव्यय कसा थांबविता येईल हे पाहण्यासाठी व्हाय-वेस्टचे काम सुरु झाले. या कामाची सुरुवात अगदी साध्या गोष्टीपासून करण्यात आली. हॉटेल्समध्ये आलेल्या ग्राहकांना पिण्यास पाणी दिले जाते, तेव्हा किती तरी ग्राहक त्या ग्लासमधून एखादाच घोट पाणी पितात. उरलेले पाणी बहुतेकवेळी वायाच जात असते. अशा प्रकारे प्रत्येक रेस्टॉरंटमधल्या वाया जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाण पाहिले, तर हे प्रमाण वर्षाला चौदा मिलियन लिटर्स इतके आहे ! एकीकडे पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न भेडसावत असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणे योग्य आहे का? हाच प्रश्न सर्वांच्या लक्षात आणून देण्यासाठी ‘व्हाय वेस्ट’ तर्फे मोठे सिग्नेचर कॅम्पेन सुरु करण्यात आले आहे.

‘स्टारबक्स’ ही मूळ अमेरिकन कॅफे चेन भारतातील अनेक शहरांमध्ये लोकप्रिय असून, या कॅफेमध्ये दिली जाणारी कॉफी एकदाच वापरता येण्याजोग्या, प्लास्टिकचे लायनिंग असणाऱ्या कप्समध्ये दिली जाते. त्यामुळे हे कप री-सायकल करता येत नाहीत. २००८ साली शंभर टक्के री-सायकल करता येतील असे कप्स ग्राहकांना पुरविण्याचा वायदा स्टारबक्सने केला होता, आणि पुढील काही वर्षांमध्ये जगभरातील सर्व स्टारबक्स कॅफेंमध्ये केवळ शंभर टक्के ‘रिसायकलेबल’ कप्स पुरविण्यात येतील असेही स्टारबक्सच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र आजतागायत हे वायदे पूर्णत्वाला गेलेले पहावयास मिळत नाहीत. याचसाठी प्रार्थना गुप्ता नामक पंचवीस वर्षीय युवतीने सिग्नेचर कॅम्पेन सुरु केले असून, आतापर्यंत अठ्ठेचाळीस हजार लोकांचे समर्थन या कॅम्पेनला लाभले आहे.

नम्रता अरोरा सिंह या युवतीने जेव्हा नव्या शहरामध्ये स्थलांतर केले, तेव्हा आसपासच्या परिसराची, बाजाराची फारशी माहिती नसल्याने घरच्या वाणसामानापासून ते घरातील इतर उपयोगी सामानापर्यंत सर्व काही घरबसल्या मिळविण्याचा सोपा पर्याय तिने निवडला. हा पर्याय म्हणजे अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन शॉपिंग साईट्स. मात्र जसजसे नम्रताने मागविलेले सामान तिच्यापर्यंत येऊन पोहोचू लागले, तेव्हा हे सामान पॅक करून पाठविताना प्लास्टिकचा अत्यधिक वापर केला जात असल्याचे तिच्या लक्षात आले. एखादी वस्तू मोडू नये म्हणून ‘बबल रॅप’ मध्ये त्याचे पॅकिंग करणे योग्य असले, तरी अनेकदा आवश्यकता नसतानाही अनेक वस्तू प्लास्टिकच्या अनेक थरांमध्ये गुंडाळलेल्या पाहून नम्रता अस्वस्थ होत असे. ही समस्या आपल्या प्रमाणेच अनेकांना भेडसावत असणार हे ओळखून नम्रताने एक सिग्नेचर कॅम्पेन सुरु केले आहे. हे कॅम्पेन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि तत्सम ऑनलाईन शॉपिंग साईट्सना उद्देशून आहे. या सर्व ऑनलाईन शॉपिंग साईट्सनी आपले आयुष्य खूप सोपे केले आहे हे जरी खरे असले, तरी या साईट्सकरवी सामानाच्या डिलिव्हरीज् अधिक इको फ्रेंडली कशा केल्या जाऊ शकतात याचे काही पर्याय सुचविणारे हे कॅम्पेन आहे. बेडशीट्स, किंवा कपडे या वस्तू मूळ पॅकेजिंग मध्ये असताना या पॅकेजिंगला देखील प्लास्टिकच्या थरांमध्ये गुंडाळणे, वस्तूबरोबर येणारे बिल छापील स्वरूपात न पाठविले जाता इ-मेल किंवा एसएमएसच्या रूपात पाठविले जाणे, वस्तू डिलिव्हर झाल्यानंतर शक्य असल्यास पॅकेजिंग करण्याकरिता वापरण्यात आलेली खोकी परत घेतली जाऊन ती रिसायकल करणे किंवा त्यांचा पुनर्वापर केला जाणे, असे काही पर्याय या कॅम्पेनद्वारे सुचविण्यात आले आहेत.

Leave a Comment