‘स्टारबक्स’ वतीने चीनमध्ये ‘सायलेंट कॅफे’


एखादा कॅफे म्हटले, की गरमगरम वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेत जमलेली गप्पांची मैफल हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर अगदी सहज उभे राहते. मात्र या सर्वसामान्य कॅफेच्या कल्पेनेच्या विरुद्ध कल्पना अंमलात आणत, सुप्रसिद्ध अमेरिकन कॉफी-चेन स्टारबक्सच्या वतीने दक्षिण चीनमधील गंग्झाऊ प्रांतामध्ये ‘सायलेंट कॅफे’ सुरु करण्यात आला आहे. या कॅफेची विशेषता अशी, की या कॅफेमध्ये काम करणारे अर्ध्याहून अधिक कर्मचारी मूकबधीर आहेत. मूकबधीर व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टारबक्सच्या वतीने ‘सायलेंट कॅफे’ची कल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे.

सध्याच्या काळामध्ये मूळ सियॅटलची असलेली स्टारबक्स खूपच लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे. संपूर्ण देशभर स्टारबक्सचे एकूण ३८०० कॅफेस कार्यरत असून, यापैकी गंग्झाऊ येथे असणारा हा स्टारबक्स कॅफे ‘सायलेंट कॅफे’च्या नव्या संकल्पनेमुळे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या सायलेंट कॅफेमध्ये काम करणाऱ्या तीस कर्मचाऱ्यांपैकी चौदा कर्मचारी मूकबधीर आहेत. आपल्या ऑर्डर्स या कर्मचाऱ्यांना सहज देता याव्यात आणि ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डर्स कर्मचाऱ्यांना समजण्यास अडचण होऊ नये यासाठी स्टारबक्सच्या वतीने एक खास ऑर्डरिंग सिस्टम विकसित करण्यात आली आहे. या सिस्टमच्या सहाय्याने एक शब्दही न उच्चारता ग्राहकांना आपल्या आवडत्या कॉफीची आणि खाद्यपदार्थांची ऑर्डर देणे शक्य झाले असून, कर्मचारी मूकबधीर असले, तरी या विशिष्ट ऑर्डरिंग सिस्टमच्या मदतीने ग्राहकांची ऑर्डर समजून घेऊन त्यांना हवे ते खाद्यपदार्थ सर्व्ह करणे कर्मचाऱ्यांना शक्य झाले आहे.

या विशिष्ट ऑर्डरिंग सिस्टममध्ये सर्व खाद्यपदार्थ आणि पेयांना विशिष्ट क्रमांक देण्यात आले असून, ग्राहकांना या पदार्थांच्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टीची आवश्यकता असल्यास लिखित स्वरूपामध्ये ग्राहक त्यांना हव्या असलेल्या पदार्थांची मागणी करू शकतात. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टारबक्सने आणखीही सायलेंट कॅफे सुरु करण्याची सिद्धता सुुरु आहे.

Leave a Comment