भारताच्या आणखी एका लेकीची ‘आकाशभरारी’!


देशात एकीकडे निवडणुकीचे वारे वाहत असताना आणि निवडणूक निकालांच्या वादळात देश सापडलेला असतानाच एक अभिमानास्पद घटना घडत आहे. बातम्यांच्या गदारोळात ही घटना दुर्लक्षिली जाऊ नये. भारताची आणखी एक लेक अभिमानास्पद भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे.
फ्लाईट लेफ्टनंट भावना कंठ नावाची ही भारतकन्या आपल्या पहिल्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. कोण आहे ही लेफ्टनंट भावना कंठ? भावना कंठ या लढाऊ वैमानिक म्हणून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तीन महिलांपैकी एक असून त्या आता प्रत्यक्ष मोहिमेत भाग घेणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक ठरतील. भारतीय वायुसेनेत लढाऊ वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी तीन महिला अधिकाऱ्यांची निवड झाली होती. त्यातील फ्लाईट लेफ्टनंट भावना कंठ यांचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्या आता मोहिमेवर जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-21 बायसन या आपल्या प्रमुख लढाऊ विमानाचे शेवटचे प्रशिक्षण उड्डाण लेफ्टनंट कंठ यांनी पूर्ण केले. (बालाकोटमधील कारवाईनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एफ-16 विमान ज्या विमानातून पाडले तेच हे मिग-21 बायसन!) भावना यांनी हे विमान संपूर्ण दिवस एकट्याने उडवले. त्यांनी जेट फाईटर विमान उडविण्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. जेट फाईटर विमानाचा वेग अत्यंत जास्त असतो आणिआतापर्यंत महिलांना हे विमान उडविण्याची परवानगी नव्हती. आता एका महिला अधिकाऱ्याने ही एक ऐतिहासिक आणि मोठी कामगिरी केली आहे. मोहिमेवर जाण्यासाठी तयार असलेल्या त्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक आहेत, असे हवाई दलाने निवेदनात म्हटले आहे.

भारतीय हवाई दलात 18 जून 2016 रोजी पहिल्यांदा महिला युद्ध वैमानिकांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर मोहन सिंह आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह भावना कंठ यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्वतः या तिघींना लढाऊ वैमानिक म्हणून समाविष्ट केले. हा भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस असल्याचे त्यावेळी पर्रिकर यांनी म्हटले होते. त्यातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग २१ बायसन हे लढाऊ विमान उडवत इतिहास रचला होता. त्यांनी हे उड्डाण 19 फेब्रुवारी 2018 मध्ये भरले होते. अवनी यांनी गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन आकाशात झेप घेतली होती. भावना यांनी गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिल्यांदा मिग-21 बायसन विमानातून उड्डाण केले होते. लेफ्टनंट भावना कंठ सध्या बिकानेर येथील तळावर तैनात असून त्यांनी रात्रीच्या मोहिमेचे प्रशिक्षण पूर्ण केले तर त्यांना रात्रीच्या मोहिमेवर जाण्याचीही परवानगी देण्यात येईल. अत्यंत कठोर मेहनत आणि चिकाटी या कारणांमुळे भावना यांनी हा मान मिळविला, असे हवाई दलाचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले.

भावना कंठ यांचा जन्म 1 डिसेंबर 1992 रोजी बरौनी (बिहार) येथे झाला. भारतीय हवाई दलात वैमानिक होणे, हे भावना यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. त्यांचे वडील इंडियन ऑयल कंपनीत अभियंता आहेत. बेगुसराय येथील डीएवी विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. आईओसीएलमधून इयत्ता दहावीत परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त अंक मिळाल्याबद्दल त्यांना ‘मेधा पुरस्कार’ मिळाला होता.

बिहारमधील पाटणा येथे इंजीनियरिंगची प्रवेश परीक्षा देतानाच भावना यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी महिलांना एनडीएमध्ये प्रवेश देण्यात येत नसे. तेव्हा त्यांनी बेंगलुरु येथून बीएमएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्या नोव्हेंबर 2017 मध्ये लढाऊ स्क्वॅड्रनमध्ये सामील झाल्या होत्या.

जगात अत्यंत मोजक्या देशांमध्ये महिलांना लढाऊ वैमानिक होण्याची परवानगी दिली जाते. ब्रिटन, अमेरिका, इस्रायल आणि पाकिस्तान या देशांमध्येच केवळ महिला लढाऊ वैमानिक आहेत. आता या देशांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. त्यात पहिलेपणाचा मान मिळवून लेफ्टनंट भावना कंठ यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, यात शंका नाही.

Leave a Comment