स्पॅनिश दाम्पत्याच्या घरामध्ये हजारो अचानक सापडल्या हजारो मधमाश्या


एखाद्या घरामध्ये नवीनच राहायला गेलेले असताना संपूर्ण घराची, आसपासच्या परिसराची ओळख होईपर्यंत अगदी लहानशा आवाजानेही आपण सावध होत असतो. एकदा घर आणि आसपासचा परिसर सवयीचा झाला, की हे लहान सहान आवाज जाणवतही नाहीत. मात्र एखाद्या घरामध्ये काही दिवस घालविल्यानंतर चित्रविचित्र आवाज सुरूच राहिले, आणि हे आवाज नेमके कुठून येत आहेत हे कळेनासे होऊ लागले, तर मात्र हा चिंतेचा विषय ठरू शकतो. अशावेळी कितीही नाही म्हटले, तरी थोडीफार भीतीची भावना मनामध्ये घर करू लागते.

स्पेनमधील ग्रनाडा प्रांतामध्ये राहण्याऱ्या दाम्पत्याची कहाणीही अशीच आहे. या दाम्पत्याने काही काळापूर्वीच नवे घर खरेदी केले होते. मनासारखे घर खरेदी करता आल्याने हे दाम्पत्य अतिशय आनंदात होते. या दाम्पत्याचा दिवसभराचा वेळ तर कामानिमित्त घराबाहेरच जात असे. संध्याकाळी घरी परतल्यानंतर रात्रीचे भोजन घेऊन जेव्हा हे दाम्पत्य आपल्या बेडरूममध्ये झोपण्यास जात असे, तेव्हा अचानक येणाऱ्या विचित्र आवाजांनी या दाम्पत्याची झोप उघडत असे. सुरुवातीला त्यांनी या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, मात्र दिवसेंदिवस आवाज वाढू लागला.

हा आवाज नेमका कशाचा येत आहे हे शोधण्याचा या दाम्पत्याने खूप प्रयत्न केला, पण आवाज नक्की का येत असे, याचे कुठलेच कारण स्पष्ट होऊ शकले नाही. जसजसे दिवस जाऊ लागले, तास तसा आवाजही वाढू लागला. अखेरीस न राहवून या दाम्पत्याने, आपल्या घरामध्ये काही तरी अदृश्य शक्ती आहे असे वाटून पॅरानॉर्मल एक्स्पर्ट्सची मदत घेण्याचे ठरविले. ठरल्या प्रमाणे हे विशेषज्ञ आले, आणि या दाम्पत्याने वर्णन केलेला आवाज त्यांनाही ऐकू आला. विशेषज्ञांनी सर्वत्र शोध घेतला असता, हा आवाज बेडरूममधील एका भिंतीच्या मागून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाहेरून एकदम नीटनेटक्या दिसणाऱ्या या भिंतीच्या आतमध्ये काही असावे असे या विशेषज्ञांना वाटल्याने त्यांनी भिंत तोडण्याचा निर्णय घेतला.

विशेषज्ञांच्या सल्ल्याने जेव्हा कारागिरांनी भिंत तोडली, तेव्हा या भिंतीच्या पाठीमागे जे दृश्य दिसले, ते पाहून सर्वच जण आश्चर्याने थक्क झाले. या भिंतीच्या मागे एका भले मोठे मधमाश्यांचे पोळे असून, या पोळ्यामध्ये हजारो मधमाश्या होत्या आणि मधमाश्यांच्या गुंजारवामुळे त्या दाम्पत्याला अस्वस्थ करणारा तो विचित्र ध्वनी उत्पन्न होत होता. अखेरीस हे मधाचे भेल मोठे पोळे हलविण्यात आले, आणि तेव्हा कुठे जाऊन हा आवाज येणे बंद झाले. अशा रीतीने अखेर या रहस्याचा उलगडा झाला, आणि हे स्पॅनिश दाम्पत्य चिंतामुक्त झाले.

Leave a Comment