भारतातील सरोवरे आणि त्यांच्याशी निगडित आख्यायिका


भारतामध्ये अनेक नद्या आणि अनेक सुंदर सरोवरे आहेत. यातील अनेक ठिकाणे आजच्या काळामध्ये लोकप्रिय पर्यटनस्थळे म्हणून नावारूपाला येत आहेत. यातील काही सरोवारांशी निगडित काही रोचक आख्यायिका आहेत. मध्य प्रदेशातील भोपाल शहराच्या पश्चिमी भागामध्ये ‘भोजताल’ नामक मोठे सरोवर आहे. याच सरोवराला ‘बडा तालाब’ या नावानेही ओळखले जाते. या सरोवराला ऐतिहासिक महत्व असून, भोपाल शहराला याच सरोवरातून पाणीपुरवठा केला जातो. हे सरोवर राजा भोजाने बनवविले असून, हे सरोवर का निर्माण केले गेले याविषयीची आख्यायिका मोठी रोचक आहे. या आख्यायिकेच्या नुसार राजा भोजाला एकदा त्वचा रोग उद्भवला. खूप वैद्य झाले, हकीम झाले, काढे, औषधे, सर्व काही झाले. कशाचा गुण येईना. एक दिवस राजाच्या दरबारी आलेल्या एका साधू महाराजांनी राजाला एक उपाय सांगितला. साधू महाराजांनी राजाला एका सरोवर बनविण्यास सांगून त्या सरोवरामध्ये ३६५ उपनद्यांमधून जल आणून या जलामध्ये स्नान करण्याचा सल्ला दिला. साधू महाराजांच्या सल्ल्यानुसार हे सरोवर बनविले जाऊन ज्यामध्ये ३६५ उपनद्यांचे जल आणले गेले, तेच सरोवर ‘भोजताल’ म्हणून ओळखले गेले.

श्रीनगर म्हटले, की बर्फाच्छादित शिखरे, अनेक सुंदर बगीचे आणि अर्थातच ‘शिकारा’मधून दाल लेकची सफर ओघाने येतेच. दाल लेक हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. या सरोवराशी निगडित आख्यायिकेनुसार या सरोवराच्या पलीकडील किनाऱ्यावर असलेल्या इसाबार गावामध्ये देवी दुर्गेचा वास आहे. दाल सरोवराचे सौंदर्य अभूतपूर्व असून, तत्कालीन मुघल शासकांनी या सरोवराच्या भोवती अनेक आलिशान हवेल्या बांधल्या. ब्रिटीश राजवटीमध्ये ब्रिटिशांनी या सरोवरामध्ये ‘हाऊसबोट्स’ बंदविल्या. या हाऊसबोट्स आजही दाल लेकमधे पहावयास मिळत असून, पर्यटक आवर्जून या ठिकाणी वास्तव्यास येत असतात.

उत्तर प्रदेशातील कुमाऊ भागामध्ये असलेले भीमताल सरोवर पाच पांडवांमधील सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या भीमाला समर्पित असून, या सरोवराच्या सान्निध्यात भीमाने काही दिवस वास्तव्य केल्याचे म्हटले जात असल्याने या सरोवराला भीमताल नाव पडले आहे. कुमाऊ राजवंशाच्या राजा राज बहादूर यांनी बंधाविलेले प्राचीन मंदिर या सरोवराच्या किनाऱ्यावर आहे. ओरिसामधील सुप्रसिद्ध चिलका सरोवराची आख्यायिकाही मोठी रोचक आहे. या आख्यायिकेच्या नुसार, चौथ्या शतकामध्ये रक्तबाहु नामक एका दरोडेखोरांच्या सरदाराने पुरी शहरावर आक्रमण करून तेथून संपत्ती लुटून नेण्याचा घाट घातला. पुरी शहराजवळ येताच रक्तबाहूच्या सर्व जहाजांनी समुद्रामध्ये पडाव टाकले. पण पुरी मध्ये राहणाऱ्या काही नागरिकांना रक्तबाहुच्या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी विना विलंब समस्त ग्रामस्थांना धोक्याची सूचना दिली.

रक्तबाहू आक्रमण करण्यास येत असल्याची सूचना मिळताच सर्व ग्रामस्थ आपापल्या मौल्यवान वस्तूंसह तातडीने शहर सोडून निघून गेले. रक्तबाहूला याची काहीच कल्पना नसल्याने जेव्हा तो पुरी गावामध्ये शिरला, तेव्हा संपूर्ण रिकामा झालेला गाव पाहून तो संतापला. घडल्या प्रकाराचा दोष त्याने समुद्राला दिला. समुद्राने रक्तबाहूपुढे नमते घेतले, आणि त्याच्या सैन्याला वाट करून देण्यासाठी समुद्र दुभंगला. रक्तबाहू आणि त्याचे सैन्य समुद्रातून थोडे दूरवर पोहोचताच, समुद्राच्या लाटा जोराने उसळल्या आणि त्या प्रवाहामध्ये रक्तबाहू आणि त्याचे सैन्य वाहून गेले. याच लाटांच्या पाण्याने चिलका सरोवरचे निर्माण झाले असल्याची आख्यायिका आहे.

Leave a Comment