‘या’ फलंदाजाचा विश्वचषक स्पर्धेत असणार बोलबाला


नवी दिल्ली – आता काहीच दिवस विश्वचषक स्पर्धेला शिल्लक राहिले असून त्यासाठी प्रत्येक संघ तयारी करण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे विश्वचषक कोण जिंकणार, कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल याचे भाकीत क्रिकेट विश्वातील दिग्गज माजी खेळाडू करत आहेत. या विश्वचषक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर आपल्या स्फोटक खेळीने धुमाकूळ घालणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने म्हटले आहे.

ब्रेट ली पुढे बोलताना म्हणाला की, धावांचा डेव्हिड वॉर्नर हा भुकेला असून त्याची या स्पर्धेतील फलंदाजी पाहण्यासारखी असेल. वॉर्नरच विश्वचषक स्पर्धेच्या अखेरीस सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवेल, असा विश्वासही ब्रेटलीने व्यक्त केला. वॉर्नरने नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात धमाकेदार फलंदाजीत १२ सामने खेळताना १ शतक व ८ अर्धशतकांसह ६९.२० सरासरीने ६९२ धावा केल्या. तसेच ‘ऑरेंज कॅप’चा मानही त्यालाच मिळाला.

काही दिवसांपूर्वीच विश्वचषकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा पाच वेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने केली आहे. १ वर्षांची बंदी संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला या संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये येत्या ३० मे पासून विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. यात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध १ जूनला होणार आहे.

Leave a Comment