मोदींच्या बायोपिकचा नवा ट्रेलर रिलीज


येत्या शुक्रवारी म्हणजेच २४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित ‘पी. एम. नरेंद्र मोदी’ चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मोदींच्या जीवनातील विविध घटना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. विवेकने या घटना त्यांच्या रुपात पडद्यावर साकारल्या आहेत.

पीएम मोदी हा बायोपिक निवडणुका सुरू होण्यापूर्वीच रिलीज केला जाणार होता. पण या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. आता २४ मे रोजी प्रदर्शनापूर्वीच वादात अडकलेला हा चित्रपट रिलीज होणार आहे. यू-ट्यूबवरून या चित्रपटाचे सुरुवातीचे ट्रेलर आणि गाणी हटवण्यात आले होते. पण आता या चित्रपटाचा नवा ट्रेलर प्रदर्शनाच्या काही दिवस आधी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

विवेक ओबेरॉयची दमदार झलक या नव्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. गांधी घराण्यावरही या ट्रेलरमधुन निशाणा साधण्यात आला आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर अलिकडेच विवेक ओबेरॉयने शेअर केले होते. ‘एक बार फिर आ रहे है मोदी’, असे कॅप्शन या पोस्टरमध्ये दिले होते. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बोमन ईराणी, मनोज जोशी, प्रशांत नारायण, झरीना वहाब, बरखा सेनगुप्ता, अंजन श्रीवास्तव, यातीन कार्येकर, रमाकांत दायमा, अक्षत साळूजा, जिमेश पाटील आणि दर्शन कुमार हे कलाकारही या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट एकुण २३ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment