भारत असो वा ऑस्ट्रेलिया – विजय अदानींचाच!


एकीकडे भारत सार्वत्रिक निवडणुकींच्या निकालासाठी सज्ज झालेला असतानाच साता समुद्रापलीकडे ऑस्ट्रेलियात नवीन सरकार सत्तेवर आले आहे. मात्र या दोन्ही निवडणुकींचा फायदा एकाच व्यक्तीला किंवा कंपनीला झालेला दिसतो आणि तो म्हणजे गौतम अदानी.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच-झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा विजय झाला. तसेच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परत येण्याचा अंदाज एक्झिट पोलनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेअर बाजारात अदानी समुहाच्या कंपन्यांच्या समभागाच्या किमती सोमवारी वाढल्या.

गौतम अदानी या अब्जाधीश उद्योगपतीने देशाच्या उद्योग वर्तुळात आघाडीचे स्थान मिळविले आहे आणि त्याचा संबंध मोदींशी त्यांच्या असलेल्या जवळीकीशी लावला जातो. मोदी सत्तेवर आल्यापासून अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअरचा भाव 170 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात हीच वाढ 40 टक्के होते. मात्र मोदी सरकारकडून आपल्याला काहीही सवलत मिळत नसल्याचा दावा अदानी यांनी केला आहे. त्याच कारणाने गौतम अदानी हे आतापर्यंत भारतीय राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत.

विशेष म्हणजे अदानी यांच्या कंपन्या हा ऑस्ट्रेलियातील निवडणुकांमध्येही प्रचाराचा एक मुद्दा होता. तिथे अदानी माईनिंग ऑस्ट्रेलिया या नावाने अदानी समुहाचे कामकाज चालते आणि या कंपनीमार्फत होणाऱ्या खाणींच्या उत्खननाला तेथील पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. उत्तर क्वीन्सलँड प्रांतातील कार्माइकल कोलमाईन प्रोजेक्ट ही खाण अडानींना देण्यात आली होती. अदानी विलमार कंपनीच्या या प्रस्तावित खाणींना विरोध करण्यासाठी ऑस्ट्रेलियात विविध शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. राजधानी सिडनीसह, ब्रिस्बेन, मेलबर्न, गोल्डकोस्ट आणि पोर्ट डग्लसमध्ये हजारो नागरिकांनी अदानींच्या खाणींना विरोध केला. या खाणींमुळे ऑस्ट्रेलियाचे पर्यावरण दूषित होणार असल्याचा आरोप निदर्शकांनी केला होता. इतकेच नाही, तर या खाणींमुळे दी ग्रेट बॅरियर रीफमधल्या समुद्राखालची जैवविविधता नष्ट होणार असून, हा प्रकल्प ग्लोबल वॉर्मिंगलाही हातभार लावत असल्याचा त्यांचा दावा होता.

भारतात अदानी आणि मोदींच्या जवळीकीबाबत केवळ चर्चा होते, मात्र ऑस्ट्रेलियात त्यांच्या प्रकल्पावरून चक्क सार्वमत घेण्यात आले होते. इतकेच नव्हे तर गौतम अडानींना देण्यात आलेले खाणींचे पट्टे रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली होती. तेथील एका न्यायालयाने त्यांच्या खाणीचा पट्टा रद्दही केला होता.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेतही या विषयावरून जोरदार चर्चा झाली होती आणि राजकारण्यांमध्ये दोन गट पडले होते. या प्रकल्पामुळे आर्थिक विकास होईल, गुंतवणूक वाढेल, रोजगार वाढेल असे काही जणांचे म्हणणे आहे तर यामुळे पर्यावरणाची हानी होईल आणि हवामान बदलांना चालना मिळेल. दुष्काळ, पूर, वणवे आणि नैसर्गिक जीवनाचा विनाश होईल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियातील विरोधी लेबर पार्टीने नवीकरणीय उर्जा आणि कार्बन उत्सर्जनासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य बाळगले होते. त्यामुळे तो पक्ष जिंकेल असा सर्वसाधारण अंदाज होता. मात्र ऑस्ट्रेलियातील निवडणुकांच्या निकालाने अदानी समुहात उत्साह संचरला नसता तरच नवल.

लिबरल पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीने अगदी आश्चर्यचकित विजय मिळाला आणि अदानी समुहाला संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या सरकारला मिळालेल्या यशामुळे अदानी समूह उत्साहित आहे. या निकालातून खाणींबद्दल जनतेची असलेली अनुकूलता दिसून आली आहे, असे समुहाचे म्हणणे आहे. आता क्वीन्सलँड सरकारने जनतेचा कौल ऐकावा आणि प्रकल्पासाठी आवश्यक सर्व आवश्यक मंजुरी लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी अदानी समुहाने निवेदनाद्वारे केली आहे.

म्हणूनच अदानी समुहाची मुख्य कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायजेसचा भाव 29 टक्क्यांनी वाढला. गेल्या दोन वर्षांतील शेअर बाजारात या समभागाच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. अदानी पॉवर, अदानी गॅस आणि अदानी ग्रीन नर्जी या कंपन्यांच्या भावातही 15 टक्क्यांची वाढ झाली. आता भाजप सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाल्यामुळे अदानी समुहाला आणखी फायदा मिळेल, असा बाजारातील भागधारकांचा अंदाज आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, निवडणूक भारतातील असो वा ऑस्ट्रेलियातील, विजय अदानींचाच होतो!

Leave a Comment