आता इंस्टाग्रामच्या कोट्यावधी युजर्सचा डेटा लीक


मुंबई : सोशल मीडियावरील डाटा लीक होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. फेसबुकवरील डेटा चोरीचे प्रकरण ताजे असतानाच इंस्टाग्रामवरील डेटा लीक झाल्याचे आता समोर आले आहे. याबाबतची माहिती ‘टेकक्रंच’ या वृत्तपत्राने दिली आहे.

यासंदर्भात टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार, इंस्टाग्रामवरील जवळपास 4 कोटी 90 लाख युजर्सची माहिती लीक झाली आहे. अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड ब्लॉगर यांसारख्या व्यक्तींचा यात समावेश आहे. या प्रसिद्ध व्यक्तींचे फॉलोवर्स, खाजगी माहिती, प्रोफाईल फोटो, फोन नंबर, ईमेल अकाऊंट यांसारख्या गोष्टी लीक झाल्या आहेत. विशेष म्हणजे टेकक्रंचने मुंबईतील एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी ‘चॅटरबॉक्स’ने याबाबतची माहिती हॅक केल्याचे म्हटले आहे.

याबाबत इंस्टाग्रामने चौकशी सुरु केली असून, अशाप्रकारे थर्ड पार्टीद्वारे डेटा हॅक करु शकते का? याबाबतही तपास सुरु करण्यात आला आहे. इंस्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅटरबॉक्सकडे युजर्सचे फोन आणि ईमेलची माहिती नेमकी कशी पोहोचली? ती खरी आहे का? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे. तसेच कोणतीही थर्ड पार्टी डेटा लीक करु शकते का? याबाबत सध्या टेक्निकल टीम तपास करत आहे. त्याशिवाय यापुढे डेटा लीक होऊ नये, यासाठी योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचेही इंस्टाग्रामच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील चॅटरबॉक्स ही एक वेब डेव्हलपमेंट कंपनी आहे. सोशल मीडिया मार्केटिंगचे काम ही कंपनी करते. दरम्यान या प्रकरणावर चॅटरबॉक्सने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फेसबुकच्या पाच कोटी युजर्सचा डेटा चोरी झाल्याचे गेल्यावर्षी उघडकीस आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक मोहीमेत हा डेटा वापरण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी या प्रकरणानंतर कठोर उपाययोजना करत डेटा हँकिंगच्या प्रकारला आळा घातला होता.

Leave a Comment