भारतीय संघात सर्वाधिक वयस्कर खेळाडूंचा समावेश


इंग्लंडमध्ये होणारा आयसीसी विश्वचषक येत्या 10 दिवसांत भारतीय संघ खेळणार असून, भारतीय संघ यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहलीकडे विश्वचषकासाठीचे कर्णधारपद असनू, रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे. पण विश्वचषक स्पर्धेच्या रणसंग्रामात उतरणारा भारतीय संघ हा सगळ्यात वयस्कर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघात विजय शंकर आणि दिनेश कार्तिक यांना अंबाती रायडू आणि रिषभ पंत यांच्याजागी घेण्यात आले. त्याचबरोबर संघात रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनाही स्थान देण्यात आले आहे. दरम्यान विश्वचषकासाठी विराटची सेना प्रमुख दावेदार आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाचे खेळाडूंचे वय सरासरी 29.5 आहे आणि विश्वचषकाच्या रणसंग्रामात उतरणारी ही सर्वात वयस्कर टीम आहे. कर्णधार कोहली 30 वर्षांचा आहे. तर, 37 वर्षांचा महेद्रंसिंग धोनी सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तर, कुलदीप यादव (24) सर्वात युवा आहे.

1992साली खेळवण्यात आलेल्या विश्वचषकासाठी उतरलेला भारतीय संघ हा सगळ्यात कमी वयाचा संघ होता. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात उतरलेल्या भारतीय संघाच्या वयाची सरासरी 25.4 होती. त्यावेळी कर्णधार अझरुद्दीन 29 वर्षांचा होता. त्याशिवाय संघात सचिन तेंडूलकर (18), विनोद कांबळी (20), अजय जडेजा (21), जवागल श्रीनाथ (22) आणि प्रवीण आमरे (23) या युवा खेळाडूंसह कपिल देव (33), श्रीकांत (32) आणि किरण मोरे (29) हे अनुभवी खेळाडूही होते.

तर, मेहंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2011च्या विश्वचषकात खेळणाऱ्या संघाच वय 28.3 होते.या संघात 37 वर्षांचा महान फलंदाज सचिन होता. 1992च्या विश्वचषकात सचिन सगळ्यात युवा फलंदाज होता. भारतीय संघाला पहिला विश्वचषक 1983ला कपिल देव यांच्या ड्रिम टीमने मिळवून दिला. त्यावेळी भारतीय संघाचे वय 27.2 वर्ष होते. त्या संघात सुनील गावस्कर (33) सर्वात अनुभवी फलंदाज होते. रवी शास्त्री तेव्हा युवा फलंदाज होते. 1983 मध्ये 27.1 वर्ष आणि 2011मध्ये 28.3 वर्ष सरासरी असलेल्या संघाने विश्वचषक जिंकला आहे. यावेळी ही 29.5 वर्ष सरासरी असलेला संघ विश्वचषक विजयाची हॅट्रिक करेल, अशी अपेक्षा आहे. शेवटी भारतीय संघ हा सर्वात अनुभवी संघ आहे.

Leave a Comment