वेब अॅप्सना परवान्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ट्रायच्या विचाराधीन


नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा(ट्राय) दूरचित्रवाहिन्यांप्रमाणे मोबाइलच्या प्ले-स्टोअरवरील विविध अॅप्लीकेशन परवान्याच्या कक्षेत आणण्याचा विचार आहे. परवान्याच्या कक्षेत हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, सोनी लाइव्ह,अशा वेब अॅप्सना आणण्याचा प्रस्ताव ट्रायच्या विचाराधीन असून काही महिन्यांपूर्वीच ‘ट्राय’ने टीव्ही चॅनलचे दर स्वस्त करताना नवे टॅरिफ दर जारी केल्यानंतर ट्रायने आता मोबाइल अॅप्लीकेशनद्वारे टीव्ही चॅनल्सचे प्रसारण करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. ओव्हर द टॉप (ओटीटी) असे या वेब अॅपना म्हटले जाते.

टीव्ही चॅनलवरील कार्यक्रम प्रेक्षकांना पहाता यावेत यासाठी ओटीटी हे एक नवे माध्यम आहे. सध्या कोणत्याही यंत्रणेचे ओटीटी अॅपद्वारे दाखवल्या जाणाऱ्या चॅनल्सवर नियंत्रण नाही. अनेक अॅप्स मोफत आहेत. याबाबत ट्रायच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सेवा पुरवठादारांकडून केबल ऑपरेटर किंवा उपग्रह कंपन्यांना टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी कंटेट पुरवला जातो. निर्धारित शुल्कही त्यासाठी आकारले जाते, सेवा पुरवणाऱ्यांना संबंधित नियम पाळावे लागतात. पण कोणाचेही या वेब अॅपवर नियंत्रण नाही, कोणत्याही शुल्काशिवाय ते टीव्ही चॅनेलचे तसेच, वेब मालिकांचे प्रसारण करतात. त्यामुळे ट्रायच्या कक्षेत या अॅप्सनाही आणणे शक्य आहे का, यावर विचार सुरू आहे.

Leave a Comment