एक्झिट पोल – किती खरे, किती फसवे?


लोकसभेच्या निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडताच आता चर्चा सुरू झाली ती सरकार कोणाचे येणार याची. निवडणूक पूर्ण होताच वृत्त वाहिन्या आणि माध्यमांमध्ये एक्झिट पोल म्हणजे मतदानोत्तर चाचण्यांचे पेव फुटले आहे. वृत्त वाहिन्यांशिवाय अनेक खासगी संस्था, सामाजिक संघटना आणि खुद्द राजकीय पक्षही अशा पाहण्या करून घेतात. निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला अजून दोन-तीन दिवस बाकी आहेत. तोपर्यंत मनोरंजनासोबतच पुढील रणनीती ठरविण्यासाठीही या मतदानोत्तर चाचण्यांचा उपयोग होऊ शकतो. मात्र अशा चाचण्यांचा इतिहास पाहता त्यांची विश्वासार्हता नेहमीच संशयात राहिली आहे.

जवळपास सर्व एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा पूर्ण बहुमत मिळण्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष व त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) मात्र सत्तेच्या शर्यतीत खूप मागे पडल्याचे दिसून येते. म्हणूनच असावे कदाचित परंतु काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा यांनी या एक्झिट पोलना विरोधकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे षडयंत्र म्हटले आहे. एक्झिट पोलचे परिणाम हे केवळ विरोधकांचे मनोधैर्य कमी करण्यासाठी प्रचारित करण्यात येत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नये आणि सावधान राहावे, असे त्यांनी आपल्या ऑडिओ संदेशात म्हटले आहे.

ताज्या चाचण्यांच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महायुतीला नुकसान होण्याचा अंदाज आहे. तसेच बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाच्या युतीलाही फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू आणि पश्चिम बंगालात तृणमूल काँग्रेसला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. थोडक्यात म्हणजे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून विरोधकांमध्ये चिंता पसरली आहे.

देशात वृत्तवाहिन्या बोकाळल्यापासून मतचाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्या या दोन्हींचा बोलबाला वाढला आहे. मात्र अशा सर्व चाचण्यांच्या अस्सलपणाबद्दल नेहमीच शंका वर्तविण्यात येते. विशेषतः एक्झिट पोलची पारदर्शकता आणि विश्वासार्हता यांच्याबाबत नेहमीच सवाल उपस्थित करण्यात येतो. सामान्यपणे या चाचणीत मतदान करून आलेल्या मतदाराला चाचणी करणाऱ्या संस्थेचा कर्मचारी प्रश्न विचारतो. त्याआधारे कोणाला किती मते पडतील, याचा अंदाज बांधला जातो. मात्र कोणत्या मतदारांना कोणते प्रश्न विचारण्यात आले, हे संस्थेकडून सांगितले जात नाही. एक्झिट पोलसाठी रँडम सॅम्पल म्हणजे क्रम न ठरवता मतदारांना प्रश्न विचारले जातात, याबाबतही संदिग्धता दिसून येते.

भारतात सुमारे 90 कोटी मतदार असून यंदा सरासरी 67 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त मतदारांनी मतदान केले आहे. याचाच अर्थ 60 कोटी लोकांनी आपल्या मताधिकाराचा वापर केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत चाचण्या घेणाऱ्या संस्थांनी 36 हजार लोकांकडून प्रतिसाद घेतला होता, तर यावर्षी त्या तुलनेत वीसपट जास्त म्हणजे आठ लाख लोकांकडून प्रतिसाद घेण्यात आला आहे. मात्र एकूण मतदारांची संख्या पाहता हा आकडा छोटाच वाटतो. एक्झिट पोलमध्ये कदचित कोणाला किती मते मिळतील, याचा अंदाज बांधता येईलही. मात्र या मतदानाचे रूपांतर जागांमध्ये कसे होईल, हे ठरविण्यासाठी संख्याशास्त्रातील कुशलता आणि तज्ञांची गरज असते. याही बाबतीत या संस्था पारदर्शकता बाळगत नाहीत.

एकुणात पाहिले तर मतदानोत्तर चाचण्या या केवळ कल दाखवू शकतात. मागील काही वर्षांत मतदानोत्तर चाचण्या तोंडावर आपटल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. मागील पाच लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर 1998 पासून 2014 पर्यंतच्या निवडणुकांत केवळ 2014 चा अपवाद वगळता सर्व चाचण्या अयशस्वी ठरल्या होत्या. वर्ष 1998च्या निवडणुकीत एनडीए बहुमत मिळवेल, असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात आली त्रिशंकु संसद. तसेच 1999 मध्ये पुन्हा एनडीएला बहुमत मिळेल, असे म्हटले जात होते परंतु एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकालांमध्ये खूप अंतर होते. एक्झिट पोलची सर्वाधिक फजिती 2004 मध्ये झाली होती कारण तेव्हा सर्व एक्झिट पोलनी एनडीएला सरासरी 252 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता, प्रत्यक्षात आल्या 187. हीच गोष्ट 2009 मध्ये झाली. तेव्हा एनडीएला १८७ आणि यूपीएला 196 जागा मिळतील, असे सांगितले गेले. प्रत्यक्षात 262 आणि एनडीएला 159 जागा मिळाल्या होत्या.

भारतच कशाला, जगातील अनेक देशांमध्ये मतदानोत्तर चाचण्या निष्फळ ठरल्या आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे ओस्ट्रेलियाची निवडणूक. तेथे निवडणुकीनंतर वेगवेगळ्या 56 संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले होते, मात्र ते सर्व खोटे ठरले. ब्रेक्झिटच्या मतदानातही हेच दिसून आले होते.
थोडक्यात म्हणजे देशाच्या जनतेचा कौल मोजण्याचा खरा मापदंड हा निवडणूक आयोगाने घेतलेले मतदान हाच आहे. त्या मतदानाचा कौल जाणण्याचा दावा करणे म्हणजे भिंतीला तुंबड्या लावणे होय.

Leave a Comment