राजकारण्यांना विनोदाचे वावडे का?


आपल्या देशात राजकारण्यांना विनोदाचे भलतेच वावडे आहे. प्रत्येक राजकारणी आणि त्याच्या अनुयायाला आपण कोणत्याही टीकेच्या पलीकडे असल्याचे वाटते. त्यामुळे एखाद्याला फेसबुक पोस्टवरून तुरुंगात जावे लागते, कोणाला गुंड-कार्यकर्त्यांकडून मारहाण सहन करावी लागते तर कोणाला गुपचूप माफी मागावी लागते. गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जींनी केलेला तमाशा आणि आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला साजेसा काढलेला सूर, यामुळे याला दुजोराच मिळाला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यकर्तीला चक्क तुरुंगात टाकले. कारण काय तर या कार्यकर्तीने एक मेमे शेअर केली होती. याआधीही त्यांनी आपले व्यंगचित्र काढल्याबद्दल एका व्यंगचित्रकाराला तुरुंगवास घडवला होता. जाधवपूर विद्यापीठातील प्राध्यापक अंबीकेश महापुत्र यांनी बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढले होते. ते व्यंगचित्र त्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवरून प्रसिद्ध केले होते. त्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी यांच्या घरी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. नंतर पोलिसांनी अंबीकेश यांना अटक केली.

आता कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी राजकारण्यांची खिल्ली उडविणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याची भाषा केली आहे. म्हैसूर येथे एका सभेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले तसेच या संदर्भात कायदा करावा, असे मतही व्यक्त केले.

“तुम्ही राजकारण्यांना कोण समजता? आमची थट्टा करावी इतक्या सहजपणे आम्ही उपलब्ध आहोत, असे तुम्हाला वाटते का? जनतेमध्ये आमची टिंगल करून तुम्ही कोणाची बाजू घेत आहात? प्रत्येक गोष्ट उपहासाने सादर करण्याची शक्ती तुम्हाला कोणी दिली आहे,” असे प्रश्न कुमारस्वामींनी टीव्ही वाहिन्यांना उद्देशून विचारले.

गेल्या काही वर्षांपासून भारतात मेमे, विनोदी कार्यक्रम, व्यंगचित्र या सर्वांवरच संक्रांत आली आहे. सरकार जेवढे सत्तावादी असेल तेवढे नागरिक त्याची खिल्ली उडवतात. अन् आपली गंमत उडवलेली पचवणे हे दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.

विनोद करणे ही मुळातच आक्रमक कला आहे, कारण तिचा जन्म प्रतिक्रियेतून येतो. अतिरंजन (एक्झॅरेशन) हा त्याचा स्थायीभाव असतो. कोणत्याही कलेचा उद्देश विध्वंसस करण्याचा नसतो. तसेच व्यंगचित्रे किंवा विनोदाचाही तो उद्देश नसतो. व्यंगचित्रकाराचे किंवा विनोदी लेखकाचे किंवा मेमे तयार करणाऱ्यांचे कामच असे असते. कॅरिकेचरच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विनोदी आणि मवाळ दाखवणे, हेच त्याचे कार्य असते. त्याद्वारे तो या लोकांबद्दलची भीती दूर करतो आणि त्यांच्या शक्तीचा उपहास करतो. म्हणूनच हिटलरसारखा क्रूरकर्मा सत्ताधारीही एका साध्या व्यंगचित्राला घाबरायचा.

गंमत म्हणजे गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या प्रसारामुळे विनोदालाही पाय फुटले आहेत. विनोद मोठ्या प्रमाणात होत असून ते पसरतही आहेत. गेल्या सहा-सात वर्षांत आपण कितीतरी ‘फेकू’ आणि ‘पप्पू’ विनोद वाचले-ऐकले आहेत. मायावती आणि अमित शाह हेही मेमे निर्मात्यांचे आणि विनोदकारांची आवडते पात्रे आहेत. या नेत्यांनीही हे विनोद दिलदारीने घेतले आहेत, ही त्यांची जमेची बाजू म्हणायला पाहिजे. मात्र दिवंगत जयललिता, मायावती, ममता बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी नेहमीच व्यंगचित्रकारांवर डूख धरल्याचे दिसते. याच्या उलट स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे विनोदप्रिय आणि उमेद नेतेही या देशाने पाहिले आहेत. दुसरीकडे व्यंगचित्रकारांनीही एकंदरीत राजकारण्यांना आणि त्यातही खासकरुन सध्याच्या सरकारला आपल्या फटक्यांनी हैराण केले आहे. राज ठाकरेंसारख्या राजकारण्यानेही व्यंगचित्राच्या माध्यमातूनच मोदी-शाह जोडगोळीवर निशाणा साधला आहे आणि तोही वारंवार. मात्र त्याच राज ठाकरेंचे समर्थक एखाद्या व्यक्तीला त्याच्या फेसबुक पोस्टसाठी झोडपतात, हे कशाचे लक्षण आहे?

सार्वजनिक व्यक्तींवर विनोद करणे ही सर्रास गोष्ट आहे. त्यातही राजकारणी लोक हे जनतेला सर्वात जवळचे वाटतात त्यामुळे त्यांच्याबद्दल विनोद होणे, त्यांची टिंगल होणे ही सर्रास घडणारी गोष्ट आहे. वास्तविक राजकारण आणि विनोद हे हातात हात घालून चालतात, असे म्हटले तरी चालेल. लोक राजकारण्यांची टिंगल करतात कारण नेत्यांची वागणूक गमतीची असते. त्यासाठी एवढे नाराज होण्याची काय गरज? ही गोष्ट कोणी तरी ममता किंवा कुमारस्वामी यांना सांगायला हवी.

Leave a Comment