क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला दिली जाते मूळ विश्वचषकाची प्रतिकृती


येत्या वर्षी तीस मे पासून सुरु होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धांना सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये अनेक देशांचे क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. हा विश्वचषक आपल्याच संघाने जिंकावा अशी इच्छा आणि महत्वाकांक्षा उराशी बाळगून प्रत्येक संघ मैदानामध्ये उतरणार आहे. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना १४ जुलै रोजी लंडन येथील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता जो संघ ठरणार आहे, त्याला भव्य विश्वचषक देण्यात येणार आहे. मात्र हा विश्वचषक म्हणजे वास्तविक मूळच्या विश्वचषकाची प्रतिकृती असणार आहे, कारण खरा विश्वचषक वास्तविक इतरत्र कुठे तरी सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

वास्तविक, मूळचा विश्वचषक आंतरराष्ट्रीय क्रीकेट परिषदेच्या संग्रही आहे. १९७५, १९७९, आणि १९८३ या तीन वर्षी पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धांमध्ये विजेत्या संघांना हा मूळ हाच विश्वचषक देण्यात आला होता. या तीनही वर्षीच्या स्पर्धांचे मुख्य प्रायोजक ‘प्रुडेन्शियल पीएलसी’ असल्याने तीनही वर्षी दिल्या गेलेल्या ट्रॉफींचे डिझाईन एकसमानच होते. १९८३ साली प्रायोजक बदलल्यामुळे तेव्हा विश्वचषकाच्या ट्रॉफीच्या मूळ डिझाईनमध्येही बदल करण्यात आला. १९९९ सालापासून आयसीसीने विश्वविजेत्या संघाला स्वतःची ट्रॉफी देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हीच ट्रॉफी विश्वचषक म्हणून देण्याची प्रथा सुरु झाली.

आयसीसी देत असलेला विश्वचषक सोन्याचा आणि चांदीचा मुलामा देऊन बनविली जाते. यामध्ये चांदीच्या तीन कॉलम्सवर सोन्याचा चेंडू अशी ही ट्रॉफी असून, याचे वजन तब्बल अकरा किलो आहे. या चषकाची उंची साठ सेंटीमीटर आहे. या ट्रॉफीच्या बेसवर पूर्वविजेत्या संघांची नावे कोरलेली आहेत. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ज्या देशांचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत, त्या सर्व देशांमध्ये ही ट्रॉफी नेली जाते. यंदा या सर्व देशाच्या शिवाय ज्या देशांमध्ये आता क्रिकेट नावारूपाला येत आहे, त्या ही देशांमध्ये ही ट्रॉफी नेली गेली आहे. अशा देशांमध्ये नेपाळ, अमेरिका आणि जर्मनी सारख्या देशांचा समावेश आहे.

Leave a Comment