गुगलमधील खदखदता असंतोष!


जगात सध्या होत असलेले मोठे परिवर्तन आणि क्रांतीला इंटरनेटच कारणीभूत होत आहे, गेली 10-15 वर्षे संपूर्ण जग पाहत आहे. मात्र परंपरा आणि प्रथा यांना चिकटून असलेला एक मोठा जनसमुदार अजूनही हे स्वीकारायला तयार नाही. मायक्रोसोफ्ट कंपनीचा सहस्थापक पॉल अॅलेन याच्या सहित जगातील अनेक तज्ञांनी तर चक्क इंटरनेट बंद करण्याचीच भलामण केली होती. मात्र इंटरनेट हा आपल्या जीवनाचा भाग झाला आहे आणि तो इतक्यात तरी जीवनातून जाणार नाही. या इंटरनेटवर अधिराज्य आहे ते गुगलचे. अल्फाबेट या कंपनीचा भाग असलेल्या गुगलमध्ये आज जे घडते ते संपूर्ण जग उद्या करते. त्यामुळे गुगल काय करत आहे, याकडे आपल्यालाही पाहावे लागते. आज याच गुगलमध्ये असंतोष उफाळला असून कंपनीत बंडाचे वातावरण आहे.

तशी गुगल ही एक प्रगतीशील कंपनी मानली जाते. याच गुगलने आपल्या नोकरभरतीचे धोरण बदलून उमेदवारांसाठी पदवीची गरज काढून टाकली होती. कामाची आवड, कार्यदक्षता आणि योग्यता यांच्या आधारावरच नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असा निर्णय गुगलने घेतला. त्याद्वारे गुगलने जगभरातील सर्व शिक्षण व्यवस्थांना एका फटक्यात गारद केले होत. उमेदवारांना नोकरी त्यांच्या पदव्यांच्या भेंडोळ्यांवर नव्हे तर अंगातील प्रतिभेच्या आधारावर मिळेल, याची ग्वाहीच कंपनीने दिली होती. आता याच गुगलचे कर्मचारी कंपनीच्या विरोधात उभे आहेत. हजारो कर्मचाऱ्यांनी कंपनीत होणाऱ्या शोषण आणि छळाच्या विरोधात नोकरीला लाथ मारली आहे.

गुगलच्या कर्मचाऱ्यांच्या एका गटाने गेल्या आठवड्यात आपल्या मागण्यांना सर्वांसमोर वाट करून दिली. पूर्वी केलेल्या मागण्या मान्य करण्यासह अनेक नव्या मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या लैंगिक शोषण आणि भेदभावाच्या प्रकरणांमध्ये कंपनीने हस्तक्षेप थांबवावा, वेतन आणि संधी यांच्यातील असमानता संपवावी, लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणली जावी, लैंगिक शोषणाची तक्रार करण्यासाठी स्पष्ट धोरण तयार केले जावे. पीडितांची सुरक्षा आणि गुप्तता राखली जावी, चीफ डायव्हर्सिटी ऑफिसरचे उत्तरदायित्त्व निर्धारित केले जावे, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांनी आधी केल्या होत्या. मात्र त्या सर्वांमध्ये प्रमुख मागणी होती ती कंपनीच्या मानव संसाधन विभागाची (एचआर विभाग) खुली चौकशी करण्याची.

गुगलच्या माऊंटन व्ह्यू मुख्यालयाबाहेर या असंतुष्ट कर्मचाऱ्यांनी एक मोर्चाही काढला. या मोर्चाच्या आयोजकांनी मीडियम या संकेतस्थळावर एक पोस्ट लिहून आपली भूमिका मांडली. “गुगल ही अधिकाधिक संकटात सापडत असून कंपनीचे व्यवस्थापन अयशस्वी झाले अशल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनी आणि कर्मचाऱ्यांमधील विश्वासाला मोठा तडा गेला आहे,” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमध्ये चार मागण्या मांडण्यात आल्या आहेत. त्यात गुगलचा सह संस्थापक आणि अल्फाबेट इनकॉर्पोरेडचा मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज याने स्वतः हस्तक्षेप करावा, असे त्यांनी म्हटले आहे. “गुगलने मोर्चेकऱ्यांच्या मागण्या यापूर्वीच पूर्ण करायला हव्या होत्या, ” असे या आंदोलकांनी म्हटले आहे.

गुगलने लैंगिक छळाच्या आरोपांची ज्या प्रकारे हाताळणी केली, त्याबद्ल निदर्शकांची मुख्य तक्रार आहे. मात्र अमेरिकेचे संरक्षण खाते असलेल्या पेंटागॉनसाठी कंपनीने काम करण्याबाबत या कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. या कामाच्या निषेधार्थ गेल्या नोव्हेंबरमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये गुगलला रामराम केला होता. या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. ‘अँड्रॉईड’चा जनक म्हणून ओळखला जाणारा अँडी रुबीन याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. मात्र अँडीला गुगलने वाचविल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. या प्रकारांच्या विरोधात ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्यावर सूडाची कारवाई करण्यात आली आणि त्याला एचआर विभाग जबाबदार आहे. त्यामुळे एचआर विभागाच्या या निकृष्ट हाताळणीबाबत पारदर्शक आणि खुली चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने ‘गुगल’ ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम आणि आकर्षक कंपनी मानली जाते. आजच्या घडीला जगभरात 50 हजार कर्मचारी या कंपनीत काम करतात. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनासोबतच कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारे वातावरण, कार्यसंस्कृती, बढतीच्या संधी आणि कर्मचारी टिकून राहण्याचे प्रमाण यासाठी कंपनीची ख्याती आहे. अशा या कंपनीत जर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उसळत असेल आणि ते बंड करत असतील तर अन्य कंपन्यांची काय कथा?

Leave a Comment