ग्रीन गोल्ड पिस्त्याच्या राखणीला पोलीस दलाची मदत


काजू, बदाम. पिस्ते यासारखा सुका मेवा जगाच्या विविध देशात पिकविला जातो हे आपण जाणतो. त्यातही काही देश विशिष्ट प्रकारच्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत. इटली हा निसर्गसमृद्ध देश पर्यटकांचे आकर्षण आहेच पण आणखी एका गोष्टीसाठी तो जगात प्रसिद्ध आहे. इटलीच्या सिसिली बेटावर एटाना पर्वतरांगात वसलेल्या ब्रोन्टे या गावाची खासियत असलेले हे फळ आहे पिस्ते. जगातील सर्वोत्कृष्ट पिस्ते येथे पिकतात याची माहिती खूप कमी लोकांना आहे.


हे पिस्ते उत्कृष्ट गुणवत्तेचे आहेत त्यामुळे महाग असतात आणि किमतीमुळे त्याच्या चोऱ्या होण्याची भीती अधिक असते. यंदा यामुळे येथील पिस्ता उत्पादकांनी पिस्ते सुरक्षेसाठी पोलीस दलाची मदत घेतली आहे. पोलीस प्रमुख कॅप्टन निकोलो मोरांडी त्यांच्या पाच पोलीस अधिकारी दलासह वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पिस्ते शेतांभोवती चोवीस तास गस्त घालत आहेत. ते म्हणाले गरज वाटली तर हेलिकॉप्टरमधून गस्त घालण्याची तयारी आम्ही ठेवली आहे.


विशेष म्हणजे पिस्ते सप्टेंबर मध्ये तयार होणार आहेत. पण ज्या चोरांची या पिस्त्यांवर नजर आहे ते आत्ताच सक्रीय झाले आहेत आणि त्यामुळे आम्हाला गस्त ऑपरेशन कसे पार पडायचे याच्या सरावासाठी टीम तयार करणे गरजेचे बनले असे कॅप्टन मोरांडी यांचे म्हणणे आहे. स्थानिक व्यापार संघटनेचे प्रमुख सिम्बली यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात २३० पिस्ता उत्पादक अधिकृत शेतकरी आहेत. पिस्ते तोड, त्याची देखभाल, पाठवणी अशी अनेक कामे असतात आणि पिस्ते हाताने तोडावे लागतात. या पिस्त्याचा स्वाद, रंग खूपच उत्तम दर्जाचा आहे आणि त्यामुळे तोडणी सुरु झाली कि चोऱ्या वाढतात.

हा पिस्ता महाग आहे आणि त्यामुळे त्याला सिसिलीचे ग्रीन गोल्ड असे म्हटले जाते. इराण आणि अमेरिकेत होणारे पिस्ते किलोला २ हजार रुपये या भावाने जातात तर सिसिलीचा पिस्ता किलोला ४ हजार रुपये भावाने जातो. साल काढले तरी या पिस्त्याच्या हिरवा रंग फिका होत नाही असे समजते.

Leave a Comment