एकट्याने प्रवास करताय? मग ही ठिकाणे आहेत त्या दृष्टीने उत्तम


उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. अशा वेळी दरवेळी कुटुंबियांच्या सोबत किंवा मित्र मैत्रिणींच्या सोबत भ्रमंतीसाठी बाहेर पडण्याचे अनेक कार्यक्रम आखले जात असतात. किंबहुना भारतामध्ये भटकंतीचा कार्यक्रम बहुधा परिवारजनांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपसोबतच आखला जात असतो. पण अनेकदा प्रत्येकाची काही ना काही कामाची अडचण आल्याने अनेकवेळा भ्रमंतीचा बेत रद्द करावा लागतो आणि आपली फिरायला जाण्याची इच्छा अपूर्णच राहते. अशा वेळी, इतर कोणी बरोबर नसले, तरी एकट्यानेच कुठे जाता आले तरी किती बरे होईल असा विचारही मनामध्ये येऊन जातो. अशावेळी भारतातील काही पर्यटनस्थळांचा विचार करण्यास हरकत नाही. ही सर्वच पर्यटनस्थळे आता एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राहणे, भोजन, इथपासून स्थानिक साईट सीइंगपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा पुरवीत असतात. त्यामुळे भारतामध्ये आजकाल ‘सोलो ट्रॅव्हलिंग’ लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे.

भारताच्या उत्तर-पूर्वेकडे असलेले सिक्कीम राज्य लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये बहुतांश ठिकाणी उंच पहाड, खोल दऱ्या, सुंदर बौद्ध धर्मशाळा आणि प्रार्थनास्थळे दृष्टीस पडतात. सिक्कीमचे स्थानिक लोक अतिशय मैत्रीपूर्ण स्वभावाचे आणि उत्तम पाहुणचार करणारे म्हणून ओळखले जातात. अनेक सुंदर पर्यटनस्थळे सिक्कीम मध्ये असून, एकट्या पर्यटकासाठी देखील ही स्थळे संपूर्ण सुरक्षित आहेत. सिक्कीम प्रमाणेच हिमाचल प्रदेश राज्यही एकट्याने प्रवास करण्याच्या दृष्टीने सुरक्षित समजले जाते. हिमाचलमधील लाहौल-स्पिती ही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने लोकप्रिय होत आहेत. त्याचप्रमाणे लदाख ही एकट्याने प्रवास करण्याच्या दृष्टीने सोयीचे असले, तरी एकट्याने प्रथमच प्रवास करीत असल्यास लदाखचा पर्याय निवडणे टाळावे.

अरुणाचल प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये देखील अनेक सुंदर पर्यटनस्थळे असून, येथील स्थानिक नागरिक अतिशय मेहनती आणि प्रामाणिक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून फसवणूक होण्याचा धोका इथे फारसा नाही. त्याचप्रमाणे हम्पी आणि पुदुच्चेरी ही ठिकाणे देखील एकट्याने भटकंती करायला जाण्यास सोयीची आहेत.

Leave a Comment