नरेंद्र मोदी घडविणार इतिहास?


सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सर्व टप्पे पार पडत असताना पुढील सरकार कोणाचे येणार, याबाबत उत्सुकता अद्याप कायम आहे. संपूर्ण प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली असली तरी स्पष्ट अशी कोणतीही लाट दिसून आली नाही. मात्र प्रचार संपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकीर्दीतील पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळून स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा केला. त्यांचा हा दावा खरा ठरला, तर 2019 ची लोकसभा निवडणूक इतिहास निर्माण करणारी ठरेल.

मोदी यांनी गुरुवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, की त्यांचे सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत परतणार असून असे दीर्घकाळानंतर होणार आहे. हे खरे ठरले तर एखादा पक्ष किंवा पंतप्रधान संपूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत परतण्याची घटना 1971 नंतर पहिल्यांदाच होईल. तसेच मोदी यांच्या नावाने आणखी एक विक्रम रचला जाईल. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी येणारे ते केवळ तिसरे नेते ठरतील.

आतापर्यंतच्या 16 लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली, तर पहिल्या तीन निवडणुकांमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वात तीनदा काँग्रेसचे बहुमत असलेले सरकार सत्तारुढ झाले. तिसऱ्या लोकसभेच्या कार्यकाळात तीन पंतप्रधान झाले. पंडित नेहरु यांच्या निधनानंतर 1964 मध्ये लालबहादुर शास्त्री पंतप्रधान झाले मात्र त्यांचेही 1966 मध्ये अपघाती निधन झाले. त्यानंतर नेहरुंच्या कन्या इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या.

इंदिरा गांधी पंतप्रधानपदी असतानाच वर्ष 1967 मध्ये काँग्रेसने लोकसभेत बहुमत मिळवून सरकार स्थापन केले. इंदिरा गांधी यांच्याच नेतृत्वाखाली 1971 मध्ये काँग्रेसने लागोपाठ सत्ता मिळविली होती. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही पक्षाला ही कामगिरी करता आलेली नाही. म्हणूनच मोदींचे शब्द खरे ठरले तर एक नवा इतिहास त्यांच्या नावे लिहिला जाईल.

येथे हे लक्षात घ्यायला पाहिजे, की काँग्रेसने 1980 आणि 1984 मध्ये लागोपाठ सत्तेत पुनरागमन केले होते. मात्र या दोन्ही वेळेस पंतप्रधान वेगवेगळे होते. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने इंदिरा गांधी यांना नाकारले होते. मात्र जनता पक्षातील बेबनावामुळे त्या पक्षाचे सरकार केवळ अडीच वर्षांत कोसळले आणि इंदिरा गांधींनी 1980 मध्ये पुन्हा सत्ता मिळविली होती. मात्र ऑक्टोबर 1984 मध्ये त्यांची पदावर असतानाच हत्या झाली आणि त्यांचे चिरंजीव राजीव गांधी पंतप्रधान बनले.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 431 जागा मिळविल्या होत्या. त्यानंतर तीन दशके कोणत्याही पक्षाला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र 2014 मध्ये भाजपने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवून ती मालिका खंडीत केली होती.
आता मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा देशाची सूत्रे हाती घेणारे पंडित नेहरु आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यानंतरचे ते तिसरे नेते ठरतील. तसेच ते डॉ. मनमोहनसिंग यांच्या विक्रमाची बरोबरी करतील. डॉ. मनमोहनसिंग हे 2004 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेत आले होते. आपला कार्यकाळ पूर्ण करून त्यांनी 2009 मध्ये पुन्हा या आघाडीच्या सरकारची सूत्रे सांभाळली होती.

विशेष म्हणजे दोन वेळेस आपला कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा या पदावर पोचणारे पंडित नेहरु हे एकमेव नेते आहेत. त्यांच्यानंतर सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा मान इंदिरा गांधी यांच्याकडे जातो. त्या लालबहादुर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा 1966 मध्ये पंतप्रधान झाल्या. एका वर्षानंतर 1967 च्या निवडणुकीत यश मिळवून त्यांनी पुन्हा हे पद सांभाळले. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत भांडणामुळे त्यांनी मुदतीआधीच लोकसभा भंग करून 1971 मध्ये निवडणुका घेतल्या. त्यांत त्यांना मोठे यश मिळाले आणि त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या. मात्र गांधी यांना 1977 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्या 1980 मध्ये चौथ्यांदा पंतप्रधान बनल्या.

भाजपच्या बाजूने पाहिल्यास अटलबिहारी वाजपेयी तीनदा पंतप्रधान झाले आणि ते सहा वर्षांपेक्षा जास्त काळ या पदावर होते. पहिल्यांदा 13 दिवस, मग 13 महिने आणि त्यानंतर साडे चार वर्षे त्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यामुळे या निवडणुकीकडे इतिहास घडविण्याची एक संधी म्हणूनच मोदी पाहत असल्यास नवल नाही.

Leave a Comment