अवश्य भेट द्या बेंगळूरूनजीकच्या ‘लिटल इंग्लंड’ला


अॅस्पॅरगस, ब्रोकोली, अशा पाश्चात्य खाद्यसंस्कृतीमध्ये जास्त वापरल्या जाणाऱ्या भाज्या, दुर्मिळ जातीचे गुलाब फुलविण्यास उत्तम कसाची जमीन आणि त्याला अनुकूल असे उत्तम हवामान, निसर्गाचा लाभलेला वरदहस्त, या गोष्टींमुळे ब्रिटिशांना ही ‘होसूर’ या गावाने भुरळ घातली होती. होसूर या ठिकाणाचे सौंदर्य धरतीवरच स्वर्गाचा आभास करून देणारे असून, बेंगळूरूच्या नजीक हे निसर्गरम्य ठिकाण असल्याने बेंगळूरू वासियांचे हे आवडते पर्यटनस्थळ आहे. होसूर हे ठिकाण तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये असून, बेंगळूरू पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी बंगळूरूहून साधारण दीड तासाचा अवधी लागतो.

या गावामध्ये असलेला ‘केनीलवर्थ फोर्ट’ हे येथील प्रमुख आकर्षण आहे. इंग्लंडमधील ‘केनीलवर्थ कासल’ पासून प्रेरणा घेऊन केनीलवर्थ फोर्टची वास्तुरचना केली गेली आहे. किंबहुना थेट एखाद्या ब्रिटीश राजवाड्यासारखा दिसणारा हा भारतातील ही एक आगळी वास्तू आहे. या गावी असणारे उत्तम हवामान आणि सुपीक जमीन यामुळे ब्रिटीशांनी या ठिकाणाचा उल्लेख ‘लिटल इंग्लंड’ केला आहे. लवकरच हे नाव स्थानिक लोकांच्याही परिचयाचे होऊन कायमस्वरूपी झाले. या ठिकाणी असलेले ‘माँ प्रत्यांगीरा कालिका आलयम’ हे देवीचे मंदिरही पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. सिंहाचे मुख आणि स्त्रीचे शरीररूप असलेली देवी प्रत्यांगीरा, शिव आणि शक्तीचे रूप आहे. या मंदिराममध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दररोज पहावयास मिळत असते.

होसूर या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे फुलत असलेल्या गुलाबांच्या बागा. येथे सामान्य आणि दुर्मिळ जातीचे अनेक गुलाब फुलविले जात असून, या फुलांना देशभरातून मोठी मागणी असते. येथे असणाऱ्या ‘टॅनफ्लोरा इन्फ्रास्ट्रक्चर पार्क’ मध्ये फुलविण्यात आलेले गुलाब युरोपला निर्यात करण्यात येतात. या फुलांमध्ये ‘ताज महाल’ जातीच्या गुलाबाला विशेष मागणी असते. होसूर येथील केनीलवर्थ फोर्टला ‘ब्रेट्स कासल’ या नावानेही ओळखले जाते. या नावामागची कथा अशी, की ब्रिटीश अधिकारी मिस्टर ब्रेट यांचा वांगनिश्चय एक स्कॉटिश महिलेशी झाला होता. पण विवाहानंतर भारतामध्ये येण्यासाठी तिने एक अट ब्रेट यांना घातली. तिच्या अटीनुसार इंग्लंड किवा स्कॉटलंडमध्ये ज्याप्रमाणे भव्य, आलिशान हवेल्या किंवा राजवाडे असतात, तशीच एक आलिशान हवेली, किंवा राजवाडा ब्रेटने तिच्यासाठी बनवून द्यायची होती. म्हणूनच केनीलवर्थ कासलच्या रचनेवरून केनिलवर्थ फोर्ट किंवा ब्रेट्स कासलची वास्तुरचना प्रेरित आहे.

या शिवाय चंद्र चूडेश्वर मंदिर, बेत्रायास्वामी मंदिर, थाल्ली गार्डन लेक आणि जवळच असलेले बेत्ता मुगीलालम नामक एक लहानसे खेडेगाव, ही होसूर जवळील मुख्य पर्यटनस्थळे आहेत. होसूरमध्ये रेल्वे स्थानक असून, बेंगळूरूपासून येथे येण्यासाठी अनेक ट्रेनचे पर्याय उपलब्ध आहेत. बेंगळूरूहून होसूर पर्यंतचा प्रवास खासगी वाहनाने किंवा टॅक्सीनेही सहज केला जाऊ शकतो. तसेच बेंगळूरू पासून होसूर येथे पोहोचण्यासाठी अनेक राज्य परिवहन मार्गाच्या आणि खासगी बससेही उपलब्ध आहेत. येथे तमिळ, तेलुगु आणि कन्नड या तीनही भाषा प्रचलित आहेत.

Leave a Comment