मेलिंडा आणि बिल गेट्स यांची अशी असते दररोजची संध्याकाळ


दिवसभराची कामाची धांदल संपवून घरी परतले, की संध्याकाळ निवांत घालविता यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुप्रसिद्ध अब्जाधीश अमेरिकन उद्योजक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांचीही इच्छा सर्वसामान्यांच्या इच्छेहून फारशी वेगळी नाही. बिल गेट्स यशस्वी आणि अतिशय श्रीमंत उद्योजक असले, तरी गेट्स दाम्पत्याची राहणी अतिशय साधी आहे. किंबहुना दिवसभराच्या कामाचा मनावर आलेला ताण घालविण्यासाठी गेट्स दाम्पत्याने काही खास सवयी आत्मसात केल्या आहेत.

बिल आणि मेलिंडा गेट्स यांचा दिनक्रम अतिशय व्यस्त असला, तरी सायंकाळी घरी परतल्यानंतर आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे आणि सर्वतोपरी आहे. त्यामुळे रात्रीच्या भोजनासाठी गेट्स परिवार एकत्र येत असतो. आजकाल घरातील सर्व मंडळी एकत्र जेवण्यास बसली, तरी प्रत्येकाचे लक्ष आपापल्या हातातील फोनवर लागून रहात असल्याने भोजनाच्या वेळी संवाद असा होत नाहीच. गेट्स परिवाराच्या घरी मात्र जेवणाच्या टेबलवर मोबाईल फोन आणण्याला परवानगी नाही. आपली मुलगी फीबी हिच्यासोबत गप्पा मारत, दिवसभराच्या हकीकती जाणून घेत, सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान भोजन घेणे ही गेट्स दाम्पत्याची नित्याची सवय आहे. भोजनामध्ये देखील साधे, घरीच तयार केलेले पारंपारिक, पौष्टिक पदार्थ घेण्याला गेट्स दाम्पत्याचे प्राधान्य असते. दिवसभराच्या हकीकतींची चर्चा आपल्या परिवारासोबत केल्याने मनावरील ताण आपोपाप कमी होत असल्याचे गेट्स दाम्पत्याचे मत आहे. भोजन झाल्यानंतर भोजनासाठी वापरली गेलेली सर्व भांडी धुवून ठेवण्याची जबाबदारी बिल गेट्स यांची असते ! किंबहुना भांडी धुताना दिवसभराच्या घटनांच्या बाबतीत मनन करण्याची संधी आपल्याला मिळत असल्याचे बिल म्हणतात.

संध्याकाळच्या भोजनानंतर ऑफिसच्या कामातून विश्रांती घेतली जाते. दिवसभराची, व्यवसायासंबंधी जितकी कामे असतील, ती भोजनापूर्वी उरकण्याला गेट्स दाम्पत्य प्राधान्य देते. भोजनानंतरचा वेळ प्रामुख्याने वाचन, एकमेकांशी गप्पा किंवा टीव्हीवर एखादा चांगला कार्यक्रम एकत्र पाहणे यासाठी राखीव असतो. रात्री लवकर आणि नियमित वेळेवर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय आता गेट्स दाम्पत्याच्या अंगवळणी पडली आहे. अर्थात व्यवसायानिमित्त परदेशी प्रवास करीत असताना हे वेळापत्रक सांभाळणे गेट्स दाम्पत्याला शक्य होत नाही. पण तरीही जेव्हा शक्य असते तेव्हा, अनेक वर्षांपूर्वी आत्मसात केलेल्या सवयींचा अवलंब करण्याकडे गेट्स दाम्पत्याचा नेहमीच कल दिसून येतो.