सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपले पूर्वायुष्य विसरून जाणारी कॅटलीन लिट्ल


एके दिवशी सकाळी आपण झोपेतून उठलो आणि आपल्याला काहीच आठवेनासे झाले तर काय होईल, ही कल्पनाच भीतीदायक वाटते. मात्र सोळा वर्षीय कॅटलीन लिट्लच्या बाबतीत असे प्रत्यक्षात घडले आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाची निवासी असलेली कॅटलीन लिटल तेथील गिलफोर्ड हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. एके दिवशी शाळेमध्ये क्रॉस कंट्री स्पर्धांचा सराव सुरु असता, कॅटलीन धावत असताना तिच्या बरोबर धावणाऱ्या आणखी एका मुलीचा तिला जोराने धक्का लागला. हा धक्का इतक्या जोराचा होता, की त्यामुळे कॅटलीन तोल जाऊन जमिनीवर कोसळली आणि तिच्या डोक्याला जबर दुखापत होऊन कॅटलीन बेशुद्ध झाली.

घडलेला प्रकार पाहून शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने वैद्यकीय मदत मागविली आणि कॅटलीनला रुग्णालयामध्ये भर्ती केले. दरम्यान कॅटलीनच्या पालकांनाही घडल्या प्रकाराची सूचना देण्यात आली होती. रुग्णालयामध्ये पोहोचल्यानंतर कॅटलीनच्या मेंदूला दुखापत झाली असल्याचे डॉक्टर्सच्या लक्षात आले. याच कारणास्तव कॅटलीनला ‘अम्नेशिया’ म्हणजेच स्मृतीभ्रंश झाला. आणि त्या दिवसापासून लहानग्या कॅटलीनचे आणि तिच्या माता-पित्यांचे सर्व आयुष्याच बदलून गेले.

या विकारामुळे कॅटलीन जागी असताना जे काही तिच्या आसपास घडते, ते तिच्या लक्षात राहते, मात्र एकदा ती झोपली, की झोपेतून जागे झाल्यानंतर तिला काही तासांपूर्वी काय घडले हे अजिबात आठवत नाही. म्हणूनच कॅटलीन रात्रभराच्या झोपेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जागी झाली, की तिच्या स्मृतीतून आदला संपूर्ण दिवस पूर्णपणे पुसला गेलेला असतो. आता कॅटलीन दररोज जागी झाल्यानंतर ती कोण आहे, आपण कोण आहोत याची नव्याने ओळख तिचे आईवडील तिला दररोज करून देत असतात. त्याचबरोबर काही महत्वाच्या घटनांच्या नोट्स ते कॅटलीनच्या पलंगाजवळ ठेवतात. या नोट्स पाहून, वाचून कॅटलीनला त्या घटना किंवा त्या व्यक्ती थोड्या फार आठवतात.

कॅटलीनच्या आणि तिच्या देखभालीसाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या तिच्या आईवडिलांवर एक माहितीपट ‘माय फॉक्स एट’ या वाहिनीद्वारे बनविण्यात आला आहे. कॅटलीनला झालेल्या विकारावर उपचार सुरु असून, यासाठी दररोज सुमारे एक हजार डॉलर्स खर्च येतो. तिचा हा विकार बरा होऊन ती पूर्ववत होईल किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी तिच्यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करण्याची, आणि त्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची आपली तयारी असल्याचे कॅटलीनचे माता-पिता म्हणतात.

Leave a Comment