विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीचे नवे गाणे


मुंबई : विश्वचषक स्पर्धा 2019 साठीचे अधिकृत गाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतेच रिलीज केले आहे. या गाण्याचे नाव स्टँड बाय असे आहे. क्रिकेट विश्वचषकाला येत्या 30 मे पासून सुरुवात होत आहे. हे गाणे त्यादरम्यान जगभरात ठिकठिकाणी ऐकवले जाईल. लॉरेन आणि ब्रिटनचा सर्वात प्रभावी रुडिमेंटल बँडने स्टँड बाय हे गाणे तयार केले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हे गाणे आयसीसीने शेअर केले आहे. जारी करण्यात आलेले हे गाणे ट्विटरवर अनेकांनी रिट्विट केले आहे. मात्र यूट्यूबवर दीड लाखांपेक्षा अधिक लोकांनी हे गाणे पाहिले आहे. एकदिवसीय विश्वचषकाला 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. 5 जून रोजी भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.

दरम्यान, यंदापासून विश्वचषक स्पर्धेमध्ये एक टीम सर्व संघांसोबत सामने खेळणार आहे. या फेरीनंतर पहिले चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. अंतिम सामना 14 जुलैला खेळवण्यात येईल. 1983 आणि 2011 चा विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियात कोणत्या 15 खेळाडूंना स्थान मिळणार याबाबत उत्सुकता आहे. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची नावे निश्चित झाली आहेत, मात्र चौथ्या क्रमांकावर कोण याबाबत संघव्यवस्थापनाला डोकेदुखी आहे.

Leave a Comment