डुकाटीच्या या बाईकवर तब्बल 6 लाखांची सुट


नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम बाईक्सपैकी एक असलेल्या डुकाटी Diavel या बाईकची दिल्लीत शोरुममधील किंमत 16.15 लाख असून तिची ऑनरोड किंमत 18.12 लाख रुपये एवढी आहे. पण या बाईकच्या खरेदीवर सध्या तब्बल 6 लाखांची सूट मिळत आहे.

ही विक्री बिग बॉईज टॉईज (बीबीटी) कार डिलर करत आहे. पण केवळ 20 एवढी मर्यादित बाईकची संख्या आहे. ही बाईक 6 लाखांच्या सवलतीसह ग्राहकांना 11.99 रुपयांना खरेदी करता येईल. तुलना केल्यास ही बाईक मारुती विटारा ब्रेजा एसयूव्हीच्या टॉप मॉडेलपेक्षाही कमी किमतीत मिळत आहे. ब्रेजाच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 12.56 लाख रुपये आहे.

एवढ्या कमी किमतीत डुकाटी Diavel विकली जाण्याचे महत्वाचे कारण म्हणजे डिलरने केलेल्या बाईक खरेदीचा कालावधी. या बाईकचा 2018 चा अनसोल्ड (विक्री न झालेला) स्टॉक डिलरने खरेदी केला होता. त्यामुळेच त्यांना आता कमी किमतीत ही बाईक विक्री करता येत आहे. तुम्हाला ही बाईक जर खरेदी करायची असेल, तर तुम्हाला डिलरकडे यासाठी नोंदणी करावी लागेल.

त्याचबरोबर तुम्ही बाईक खरेदी केल्यास या बाईकचे पहिले मालक नाही, दुसरे मालक असाल. या बाईकचा पहिला मालक बाईक डिलर बीबीटी स्वतः असेल. 4 डुकाटी Diavel डिझेल बाईकही बीबीटीकडे होत्या. पण त्याआधीच बुक झाल्या आहेत. जगभरात अशा डिझेल बाईकची संख्या केवळ 666 एवढी आहे.

डुकाटी Diavel या बाईकमध्ये 1198 सीसीचे दोन सिलेंडर इंजिन आहेत. हे इंजिन 9250 आरपीएमवर 159 बीएचपीची शक्ती आणि 8000 आरपीएमवर 130.5 एनएम टॉर्क देते. या बाईकच्या लिक्विड कूल्ड इंजिनमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स असून त्यांचे वजन 239 किलोग्रॅम आहे.

Leave a Comment