मोबाईल इंटरनेटचा वेग नक्की कधी कळणार?


सध्याच्या काळात इंटरनेट आणि मोबाईल हे एक घट्ट समीकरण झाले आहे. सुमारे 60 टक्क्यांहून अधिक वापरकर्ते इंटरनेट आपल्या मोबाईलवरच वापरतात. परंतु आपल्या हातातल्या या मोबाईलवर मिळणाऱ्या इंटरनेटचा वेग किती, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मोबाइल कंपन्या सांगत असलेला वेग आणि आपल्याला मिळणारा इंटरनेटचा वेग यात मोठी तफावत असते. याबद्दल मोबाईल कंपन्यांकडून वेगवेगळे दावे केले जातात, परंतु छातीठोकपणे निश्चित वेग सांगण्याची क्षमता कोणाकडेही नाही. तसेच हा वेग मोजण्याचे साधनही वापरकर्त्यांकडे नाही. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) या संघटनेने केलेल्या ताज्या दाव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राई) सुमारे एक वर्षापूर्वी एक अॅप आणले होते. मायस्पीड नावाच्या या अॅपद्वारे रे मोबाईल इंटरनेटचा वेग मोजण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. या अॅहपच्या माध्यमातून आपण असलेल्या ठिकाणी आपल्याला इंटरनेटचा वेग किती मिळतो आहे याचा तपशील मिळतो. यामध्ये आपल्याला वायफायद्वारे मिळणाऱ्या इंटरनेटचाही वेग समजू शकतो. ‘ट्राय’ने मोबाईल इंटरनेटसाठी 2014 मध्ये काही निकष जारी केले होते. त्यानुसार मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांनी किमान डाऊनलोड वेग दाखवावा, असे सांगण्यात आले होते. मात्र मोबाईल कंपन्यांना हे रूचले नव्हते. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार किमान वेगाची खात्री दिली जाऊ शकत नाही, असे उत्तर त्यावेळी कंपन्यांकडून देण्यात आले होते. जवळपास एक वर्षापूर्वी सीओएआयने या अपवरून मोजण्यात येणाऱ्या इंटरनेटच्या वेगाला आव्हान दिले होते. मात्र आजही हा मुद्दा निकाली निघालेला नाही. उलट वापरकर्ते पर्यायी वेगमापक अॅपकडे वळत आहेत, असे बुधवारी या संघटनेने म्हटले आहे.

मोबाईल इंटरनेट डाऊनलोडच्या वेगाबाबत भारत जगात 109व्या स्थानी आहे. इंटरनेटच्या वेगाची मोजणी करणारी उक्ला या अमेरिकी कंपनीने दिलेल्या अहवालात याचा उल्लेख आहे. देशातील नागरिकांना वेगवान इंटरनेट सेवेचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी नवीन दूरसंचार धोरण जारी केले होते. त्यात 2022 पर्यंत देशातील इंटरनेटचा वेग 50 एमबीपीएसपर्यंत नेण्याचा आणि 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या क्षेत्रात 2022 पर्यंत 40 लाख रोजगारनिर्मिती होईल अशी सरकारला आशा आहे. त्यासाठी 5जी सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच गुंतवणूक वाढीबरोबरच इंटरनेटचा वेगही वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारतातील मोबाईल इंटरनेटचा वेग हा नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. खासकरून डिजिटल भारतासारखी जगातील सर्वात मोठी इंटरनेट योजना भारतात राबविली जात असताना.

मायस्पीड अॅपवरून मोबाईल डेटाचा वेग मोजण्याचा हा मुद्दा दूरसंचार उद्योगात चर्चेचा विषय ठरला होता. अँड्रॉईड प्लेस्टोरच्या आकडेवारीनुसार, देशभरात या अपचे 10 लाखांहून अधिक डाऊनलोड झाले आहेत. या अॅप्सवरून गोळा केलेल्या माहितीवरून ट्राय नेतर राष्ट्रीय पातळीवर सरासरी वेग काढते. या अॅपवरून मोजण्यात येणाऱ्या वेगावरूनच दूरसंचार कंपन्यांच्या अपलोड आणि डाऊनलोडच्या वेगाला रँकिंग दिली जाते. मात्र ट्रायच्या या अॅपवरील आकडेवारी अन्य सेवांच्या अॅपवरील आकड्यांपेक्षा वेगळे का आहेत,असा प्रश्न या कंपन्यांनी विचारला होता. आज एक वर्षानंतरही हा मुद्दा निकालात निघाला नसेल, तर वापरकर्त्यांसाठी तो चिंतेचा विषय ठरावा.

हा मुद्दा संपलेला नाही, असे सीओएआयचे महासंचालक राजन मॅथ्यू यांनी पत्रकारांना सांगितले आहे. “नियामक संस्थेने हा मुद्दा सोडवला नाही, तर तो सोडविण्यासाठी आणखी मार्गही आहेत. यासाठी स्वतंत्र उपाय नाहीत, असे नाही,” असे ते म्हणाले. मॅथ्यू यांच्या म्हणण्यानुसार, 4जी नेटवर्कसाठी ब्रॉडबँडचा किमान वेग 2 एमबीपीस ठेवावा, असे संघटनेचे म्हणणे आहे, परंतु मोबाईल कंपन्या त्यापेक्षा जास्त वेग अगोदरच देत असल्याचे विविध चाचण्यांतून दिसून आल्याचाही त्यांचा दावा आहे.

स्मार्टफोनचा वापर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते इंटरनेट आणि त्याचा वेग. ग्राहक म्हणून आपल्याला आपल्या इंटरनेटचा वेग माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. एकीकडे ग्राहकांना पैसे देऊनही योग्य तो इंटरनेटचा वेग मिळत नाही, दुसरीकडे कंपन्या मोठमोठे दावे करून नवे ग्राहक मिळवू पाहत आहेत आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ट्राय ही देशातील दूरसंचार क्षेत्राची नियामक संस्था आहे. त्यामुळे तिच्याच अपबाबत जर असा प्रश्न उपस्थित होत असेल, तर ग्राहकांनी बघायचे कोणाकडे?

Leave a Comment