#MeToo प्रकरणी नाना पाटेकरांना क्लीन चीट, तनुश्रीने म्हटले निव्वळ अफवा


अभिनेत्री तनुश्री दत्ताचा लैंगिक छळ केल्याच्या कथित प्रकरणात अभिनेते नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. पोलिसांना नाना पाटेकर यांच्या विरोधात आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार मिळालेला नाही. पोलिसांनी नाना पाटेकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्या कारणाने क्लीन चीट दिली आहे. नाना पाटेकर यांच्याविरोधात ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान लैंगिक छळ केल्याचा तनुश्री दत्ताने आरोप केला होता. या संदर्भातील वृत्त बॉलिवूडलाईफ.कॉम या संकेतस्थळाने दिले आहे.

पोलिसांनी तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर तपास सुरु केला होता. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या १५ साक्षीदारांची पोलिसांनी चौकशी केली होती. दरम्यान पोलिसांनी तनुश्री दत्ताने केलेले आरोप सिद्ध करणारा एकही साक्षीदार आम्हाला सापडला नसल्याचे म्हटले आहे. लैंगिक छळाला एकाही साक्षीदाराने दुजोरा दिला नसल्याची माहिती मिळत आहे. ज्या १५ साक्षीदारांची पोलिसांनी चौकशी केली अभिनेत्री डेजी शहाचाही त्यामध्ये समावेश होता.

मिड-डेशी बोलताना तनुश्री दत्ताने पोलिसांच्या क्लीन चीटनंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, १५ साक्षीदार कोण होते ? माझ्या बाजूने ते होते की नाना पाटेकरांच्या ? नाना पाटेकरांचे ते मित्र आहेत. मग मला ते समर्थन कसे देतील. माझा छळ झाला होता हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची गरज नाही. जेव्हा छळाचा प्रश्न येते तेव्हा अनेकदा ते न्यायालयात सिद्ध करणे कठीण जाते. अत्यंत धीम्या गतीने पोलिसांनी तपास केला. ज्यांची साक्ष पोलिसांनी नोंदवली आहे त्यापैकी अनेकांनी माझा छळ होताना पाहिला, पण मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. मग आता ते माझ्या समर्थनार्थ का बोलतील ? अशा लोकांची विचारसरणीच अशी आहे की एका गुन्हेगाराला पाठिंबा देतील आणि महिलेला खोटे ठरवतील.

दरम्यान तनुश्री दत्ताने मात्र नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाल्याचे दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, अशा बातम्या नाना पाटेकर यांच्या टीमकडून मुद्दाम पसरवल्या जात आहेत. खरे हेच आहे की नाना पाटेकरांच्या टीमने खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मीडियामध्ये नानांना क्लीन चीट दिल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. अशा पद्धतीचे कोणतेही वक्तव्य अद्याप मुंबई पोलिसांनी जारी केलेले नाही. या गोष्टीची माझे वकील नितीन सातपुते यांनी पडताळणी करून मला ही माहिती दिली असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे.

Leave a Comment