‘एफएसएसएआय’ ने भारतामध्ये या वस्तूंवर घातली आहे बंदी


‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’, म्हणजेच ‘एफएसएसएआय’ च्या वतीने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम राहावा, आणि हे अन्नपदार्थ सेवन केले जाण्याच्या दृष्टीने संपूर्ण सुरक्षित असावेत यासाठी अनेक नवे नियम अस्तित्वात आणले गेले असून, या नियमांच्या अंतर्गत भारतामध्ये काही अन्नपदार्थ उत्पादित होत असताना करावयाच्या प्रक्रियांवर बंदी घालण्यात आली आहे. पण बहुतेक वेळी ग्राहकांना या नियमांची माहिती नसल्याने या अज्ञानाचा फायदा अनेक उत्पादक घेत असतात. याच कारणास्तव जागरूक ग्राहक म्हणून या नियमांबद्दल आपल्या माहिती असणे अगत्याचे आहे.

चहा पिण्यासाठी टी बॅग्स वापरताना अनेकदा या टी बॅग्सवर असलेली स्टेपलरची पिन आपण पाहिली असेल, मात्र ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेता अशा प्रकारच्या ‘स्टेपल’ केलेल्या टी बॅग्सच्या विक्रीवर, वापरावर आणि आयातीवर एक जानेवारी २०१८ पासून कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. अनेक मिठायांवर चांदीचा वर्ख लावलेला आपण पाहतो. विशेषतः अनेक प्रकारच्या बर्फी बनविताना त्यांवर वर्ख लावला जातो. या वर्खाच्या रासायनिक चाचण्या केल्या गेल्या असता, त्यामध्ये निकेल, लेड, क्रोमियम इयादी घातक तत्वे आढळून आली आहेत.

तसेच अनेकदा प्राण्यांची चरबी वापरून हा वर्ख बनविला जात असल्याचेही उघडकीला आहे आहे. तेव्हापासून वर्ख कसा असावा याचे ठोकताळे निश्चित करणारे काही नियम ‘एफएसएसएआय’च्या वतीने लागू करण्यात आले आहेत. या नियमांच्या अनुसार हा वर्ख एका पानाच्या (sheet) रूपात उपलब्ध केला जाणे बंधनकारक असून, त्यावर कुठल्याही प्रकारच्या घड्या किंवा सुरकुत्या पडलेल्या नसाव्यात. तसेच या वर्खाच्या पानाचे वजन २.८ ग्राम असून, यातील चांदीची शुद्धता ९९९/१००० इतकी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अतिशय मोठ्या प्रमाणात विक्री होत असलेल्या अनेक तऱ्हेच्या हेल्थ सप्लिमेंट्स वरही ‘एफएसएसएआय’ चे लक्ष केंद्रित असून, अशा प्रकारच्या प्रत्येक औषधावर ‘नॉट फॉर मेडीसिनल यूज’ अशी सूचना लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या सप्लिमेंट खरेदी करताना त्यावरील सूचना काळजीपूर्वक वाचले जाणे आवश्यक आहे. अन्नपदार्थ ज्या पॅकेजिंग मध्ये पॅक केले जातात, त्या पॅकेजिंग वरील प्रिंटींग साठी टोल्युइन नामक रसायनाचा वापर करण्यात येतो. हे रसायन अन्न्पदार्थामध्ये अवशोषित होण्याचा धोका खूप मोठा असतो. या रसायनामुळे लिव्हर आणि किडनी निकामी होऊ शकतात. हाच धोका लक्षात घेऊन ‘एफएसएसएआय’ ने अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील प्रिंटींग साठी या रसायनाच्या वापरावर बंदी घातली आहे.

Leave a Comment