केनियापासून कोल्हापूरपर्यंत गाढवांवर संक्रांत – चीनमुळे!


चीनची अर्थव्यवस्था आता महासत्तांच्या बरोबरीची झाली आहे. या वाढीचा एक परिणाम असा झाला, की तेथील लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. साहजिकच त्यांचा चंगळवादही वाढला आणि त्या चंगळवादाची मागणी पुरवता पुरवता चीनच्या नाकीनऊ आले. ही मागणी भागविण्यासाठी म्हणूनच अन्य देशांकडे वळण्याची वेळ त्या देशावर आली. या ना त्या प्रकारे विविध वस्तू आयात करण्यात येऊ लागल्या. मात्र या बकासुरी मागणीमुळे जगातील प्राण्यांवरही संक्रांत आली असून गाढवासारखा निष्पाप प्राणीही त्यातून सुटला नाही.

चीनमध्ये गाढवांच्या कातडीला मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्यामुळे आधी आफ्रिकी देशांमधील गाढवांवर संक्रांत आली. आफ्रिकेत गाढवांच्या तस्करीची बाजारपेठ वाढली असून गाढवांच्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र आता हे लोण थेट तुमच्या-आमच्या गावांपर्यंत आले असून महाराष्ट्रात विविध ठिकाणी गाढव तस्करीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारही सक्रिय झाले असून वाघ वाचवा मोहिमेसारखी गाढव वाचवा मोहीम काढावी लागते की काय, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे.

आफ्रिकेतील केनिया, बुर्किना फासो, इजिप्त ते नायजेरिया अशा देशांमध्ये गाढवांच्या चोऱ्या वाढल्या असून एजंट लोक गाढवांची खरेदी करत आहेत, असे प्राणीहक्क संघटनांचे म्हणणे आहे. आफ्रिकेत गाढवांचा शेतीसाठी अधिक वापर होतो. मात्र चीनमध्ये गाढवांचा वापर मुख्यतः खाण्यासाठी होतो. चिनी भाषेत ईजीओ असे नाव असलेला एक पदार्थ गाढवांच्या कातडीत सापडतो. हा पदार्थ तब्येतीसाठी चांगला असून त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, असा चीनमध्ये समज आहे. एकेकाळी हा ईजीओ नावाचा पदार्थ ही केवळ सम्राटांसाठी असलेली बाब होती, मात्र आता देशातील वाढत्या मध्यमवर्गीय ग्राहकांमध्येही त्याची मागणी आहे. त्यासाठी खुद्द चीनमध्ये गाढवांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्यामुळे गाढवांची संख्या अर्ध्यावर आली आहे. म्हणून आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतून गाढवांची त्वचा आयात करण्याची वेळ आली आहे. त्यातून आफ्रिकेत गाढवांची संख्या घटल्यामुळे इथिओपिया, युगांडा आणि सोमालियासारख्या देशांनी गाढवांच्या निर्यातीवर बंदी घातली असून चिनी मालकीचे कत्तलखाने बंद केले आहेत. त्यामुळे हजारो गाढवांना आता लांब अंतरावरून ट्रकमध्ये कोंबून केनियामध्ये आणले जाते.

चिनी औषधांसाठी गाढवांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढले असून ही प्रथा बंद करावी, अशी मागणी पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) यासंघटनेने गुरुवारी केनिया सरकारकडे केली. शेजारच्या देशांतून आणलेल्या गाढवांना कत्तलखान्यात निर्दयपणे मारहाण करून त्यांची कत्तल केली जाते, असे संस्थेने केलेल्या तपासात आढळल्याचे पेटाने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. “केनियाने इतर अनेक आफ्रिकन राष्ट्रांप्रमाणे गाढवांची कत्तल करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पेटाने केली आहे. या क्रूरतेची कोणतीही गरज नाही, ते औषधदेखील प्रभावी असल्याचे दिसलेले नाही, ” असे पेटाच्या प्रवक्त्या अॅश्ले फ्रुनो म्हणाल्या.

हे झाले आफ्रिकेचे. मात्र गाढवाची तस्करी ही आता आपल्या अवतीभोवती होणारी गोष्ट झाली असून तिच्या तारा चीनशी जुळलेल्या आहेत. सांगली-कोल्हापूर परिसरातून गेल्या काही वर्षांत गाढवांच्या चोऱ्या वाढल्या आहेत. ट्रकध्ये गाढवे कोंबून ती सोलापूरला नेली जातात. या गाढवांची आंध्र प्रदेशात तस्करी होत असल्याचे यापूर्वी दिसले आहे.

इतकेच कशाला, देशात गाढवांची संख्या कमी झाली असून राज्यात गाढवांना संरक्षण द्या आणि त्यांची जपणूक करा, अशी मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे. केंद्राच्या आदेशानेच ही मोहीम राबण्यात येत असल्याचे पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धनंजय परकले यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात 2007 च्या पशुगणनेत गाढवांची संख्या 32 हजार होती. ती 2012 मध्ये 29 हजार झाली आहे. गाढवांची तस्करी करताना सांगोला पोलिसांनी एका टोळीला नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून गाढवे व वाहन जप्त केले आहे. या गाढवांची आंध्र प्रदेशच्या दिशेने वाहतूक होत होती. इतकेच कशाला, दोन-तीन दिवसांपूर्वी बारामती शहर पोलिसांनीही गाढवांची तस्करी करणाऱ्या काही आरोपींना रंगेहात पकडले.

केंद्रीय पर्यावरणमंत्री मनेका गांधी यांनी या संदर्भात गेल्या वर्षी 10 सप्टेंबरला बैठक बोलावली होती. त्यात गाढवांची देशात कमी होणारी संख्या यावर चर्चा करण्यात आली. गाढवे कमी होण्याबाबत केंद्राने चिंता व्यक्त केली आहे. आपल्या राज्यात गाढवांची संख्या किती आहे आणि का कमी होत आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश प्रत्येक राज्याला देण्यात आले आहेत. हेच आदेश राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहेत.

थोडक्यात म्हणजे चिनी बकासुराचे पोट भरण्यासाठी जगभरातील गाढवांचा जीव धोक्यात आला आहे. लोकांच्या दृष्टीने गाढव हा क्षुद्र प्राणी असला तरी पर्यावरणासाठी त्याचे महत्त्व मोठे आहे. केवळ वाघ-हत्तीच नाही तर गाढवासारख्या प्राण्याचे प्राणही महत्त्वाचे आहेत. त्यांची जपणूक होणेही तेवढेच गरजेचे आहे.

Leave a Comment