गौडबंगाल ते गुंडबंगाल – ममतांच्या राज्याची वाटचाल


लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान येत्या रविवारी आहे. परंतु त्याच्या पूर्वीच भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. भाजप आणि तृणमूल यांच्यात तसा संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे, परंतु मंगळवारी कोलकाता येथे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोमध्ये जो तमाशा झाला तो युद्धाच्या पातळीपर्यंत जाणारा होता. मंगळवारी अमित शाह यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने माणसे आणली. हा रोड शो कोलकाता विद्यापीठापासून जात असताना गोंधळ सुरू झाला आणि प्रसिद्ध विद्वान व समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड होण्यापर्यंत तो पोचला. दोन्ही बाजूंनी आता याबाबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत, मात्र या सर्व तमाशामुळे भारतीय लोकशाहीची अब्रू गेली याचे भान कोणालाही नाही.

ईश्वरचंद्र विद्यासागर ही काही साधीसुधी व्यक्ती नाही. पश्चिम बंगालच्या अस्मितेशी जोडलेली ती एक विभूती आहे. बंगालने निर्माण केलेल्या महान सुपुत्रांपैकी विद्यासागर हे एक होत. साहित्यापासून समाज सुधारणेपर्यंत विद्यासागर यांचे अनेक क्षेत्रांमध्ये योगदान होते. बंगालमध्ये 19व्या शतकात सुधारणांची जी एक लाट आली, ती लाट आणणाऱ्यांपैकी विद्यासागर हे एक होते. अशा एका महान व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याला क्षुद्र राजकारणापायी या पद्धतीने मानखंडनेला सामोरे जावे लागणे किती लज्जास्पद आहे?

भाजप आणि तृणमूल काँग्रेस भले एकमेकांवर दोषारोप करत असतील, परंतु प. बंगालमध्ये जे काही होत आहे त्याला हे दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. ममता बॅनर्जींनी साम्यवाद्यांना बंगालमधून हद्दपार करण्यासाठी गुंडगिरीचा आश्रय घेतला. साम्यवाद्यांनीही गुंडगिरीद्वारेच बंगालमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले होते आणि त्यांनी इतर कोणाला पाय पसरू दिले नव्हते. ठकास असावे महाठक या न्यायाने ममतांनी त्यांच्याच मार्गाने त्यांच्यावर कुरघोडी केली. ममतांनीसाम्यवाद्यांच्या गुंडगिरीविरुद्ध गुंडगिरीचा रस्ता चोखाळला आणि डाव्यांना हाकलून लावले. आता तीच त्यांची कार्यशैली बनली आहे. आता भाजप ममतांना सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी कंबर कसून उभी आहे. मात्र एवढ्या मेहनतीने उभे केलेले साम्राज्य ममता सहजासहजी भाजपला देतील, हे काही शक्य नाही. म्हणूनच ही ममतांसाठी अस्तित्वाची लढाई बनली आहे. भाजपला वरचढ होऊ न देणे, याला त्यांचे प्राधान्य आहे आणि त्यासाठी सरकारी यंत्रणेपासून गुंडांचा वापर करण्यापर्यंत हरप्रकारे त्या यत्न करत आहेत.

भाजपसाठीही ही हातघाईची लढाई आहे. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सफाया केला होता, मात्र काही मोजक्या राज्यांत भाजपची डाळ शिजली नव्हती. त्या राज्यांमध्ये बंगाल हेही एक होते. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत ममतांना हरवून आपण हिशेब पूरा करू, असा भाजपचा होरा होता. मात्र जंग जंग पछाडूनही भाजपला ते साध्य करता आले नाही. उलट ममता जास्त जागा जिंकून पुन्हा सत्तेत आल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी भाजप व अन्य विरोधी पक्षांना तुच्छतेची वागणूक द्यायला सुरूवात केली. यामुळे भाजपचा अहंकार दुखावला. त्यामुळे जशास तसे उत्तर द्यायचे म्हणून ममतांच्याच मार्गाने त्यांना उत्तर द्यायचे, यासाठी गुंडगिरीचा रस्ता त्यांनीही धरला.

या सर्वांमध्ये झाले एवढेच, की बंगाल आता गुंडगिरीसाठीच ओळखला जात आहे. बंगालची जादू एकेकाळी प्रसिद्ध होती आणि त्यामुळेच गूढबंगाल म्हणून तो ओळखला जायचा. त्याचा अपभ्रंश गौडबंगाल असा झाला. एकेकाळी गौडबंगाल म्हणून प्रसिद्ध असणारे हे राज्य आता गुंडबंगाल म्हणून ओळखला जाईल.

गुंडगिरीच्या या संघर्षात कोण जिंकेल, हे माहीत नाही परंतु हे देशहिताचे बिल्कुल नाही एवढे खरे. सत्तेसाठी गुंडगिरीचा रस्ता धरणे हे आगीशी खेळण्यासारखे आहे. कारण ही गुंडगिरी निवडणुकीसोबत संपत नाही. जो पक्ष जिंकेल त्याचे गुंड बेफाम होत जातात आणि त्याची किंमत सामान्य लोकांना चुकवावी लागते. बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये निर्माण झालेली जंगलराजची स्थिती यामुळेच आहे.

यंदाच्या सतराव्या लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान झाले आणि या सातही टप्प्यांमध्ये मतदान होणारे पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य होते. तसेच मतदानाच्या एकूण एक टप्प्यांमध्ये या ना त्या प्रकारे हिंसाचार झालेलेही ते एकमेव राज्य ठरले. परिवर्तनाची हाक देऊन सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी याहून लज्जास्पद काय असणार?

Leave a Comment