प्रथमेश परबच्या ‘टकाटक’ चित्रपटाचा बोल्ड ट्रेलर रिलीज


‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला होता. हे पोस्टर अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरल्यानंतर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे.

मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी ‘टकाटक’चा विषय तसा काहीसा बोल्ड वाटावा असाच आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना मराठीत आजवर कधीही समोर न आलेली सेक्स कॉमेडी अनुभवायला मिळणार आहे. १०० टक्के शुद्ध विनोदांना प्रसंगांची अचूक जोड देत करण्यात आलेली विनोदनिर्मिती हा या चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. सेक्स कामेडीच्या नावाखाली वाह्यातपणा किंवा थिल्लरपणा न करता कथानकासाठी जे आवश्यक आहे तितकेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक महत्त्वपूर्ण संदेशही प्रेमकथा आणि चित्रपटातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या प्रसंगांच्या माध्यमातून या चित्रपटात देण्यात आला आहे.

टाईमपास फेम प्रथमेश परब या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, रितिका श्रोत्री या नवोदित अभिनेत्रीसोबत प्रथमेशची जोडी जमली आहे. त्यामुळे ‘टकाटक’ या चित्रपटात प्रेक्षकांना एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्रीही अनुभवायला मिळेल. आजवरच्या आपल्या कारकिर्दीत प्रथमेशने आपला एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. हा चित्रपट त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. या चित्रपटात प्रथमेश-रितिकासोबत अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव, भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही विविध भूमिकेमध्ये दिसणार आहेत. मिलिंद कवडे यांनी दिग्दर्शनासोबतच निर्माते अजय ठाकूर यांच्या साथीने या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. येत्या २८ जून रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment