…म्हणजे देशाचे संरक्षण रामभरोसेच!


भारतीय सीमांचे रक्षण करणारे जवान ही भारतीयांच्या अस्मितेची ओळख आहे. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवान हा प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय आहे. मात्र या जवानांचे अस्तित्व केवळ भावनात्मक विषयातच आहे का, असा प्रश्न कधीकधी पडतो. या सैनिकांच्या बहादुरी व शौर्यावर कोणालाही संशय नाही, परंतु त्यांच्या हातात तेवढीच आधुनिक व सुसज्ज शस्त्रे असली पाहिजेत. दुर्दैवाने असे होताना दिसत नाही.

सरकारच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने (ओएफबी) पुरवठा केलेले रणगाडे, तोफा आणि हवाई सुसंरक्षण तोफांची गुणवत्ता निकृष्ट असल्याचे सांगून लष्करातील वाढत्या दुर्घटनांसाठी ते जबाबदार आहेत. खुद्द लष्करानेच हा दावा केला असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणे भाग आहे. या दुर्घटनांची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी लष्कराने संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. निवडणुका, प्रचार, राजकारण इत्यादी सर्व गोष्टी बाजूला ठेवून या घडामोडीची दखल घ्यावी लागणार आहे. हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषय आहे आणि आपल्या लाखो शूर जवानांचे प्राण तिच्याशी निगडीत आहेत. ही गोष्ट जर खरी असेल तर देशाची सुसंरक्षण रामभरोसेच आहे, असे म्हणावे लागेल.

संरक्षण उत्पादन सचिव अजयकुमार यांना हे 15 पानी पत्र लिहिण्यात आले असून त्यात म्हटले आहे, की अस्त्र-शस्त्रांच्या निकृष्ट गुणवत्तेमुळे गेल्या काही वर्षांत सेनेच्या महत्त्वाच्या शस्त्रांचे अत्यंत नुकसान झाले आहे. सेनेच्या शिफारसीवरून संरक्षण मंत्रालयाने या मुद्द्याची पडताळणी केली तेव्हा खरोखरच दोषपूर्ण शस्त्रांमुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी ओएफबी सक्रियता दाखवत नसल्याचे मंत्रालयाला आढळले. ओएफबी देशभरात 41 ऑर्डिनन्स फॅक्टरी आहत आणि हे मंडळ संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अंतर्गत काम करते. या ऑर्डिनन्स फॅक्टरींमध्ये रणगाडे, बंदुका, एके 47, एके 56, रिव्हॉल्हर, पॅराशूट, बॉम्ब, तोफा, तोफगोळे, जवानांचे बूट, बुलेटप्रुफ जॅकेट, जवानांचे युनिफॉर्म अशा विविध प्रकारच्या 650 प्रकारच्या युद्धसाहित्याचे उत्पादन करण्यात येते. जवानांना आवश्यक असलेली युद्धसामुग्री त्यामुळे मिळते. तसेच ऑर्डिनन्स फॅक्टरींमध्ये बनवण्यात येत असलेली युद्धसामुग्री निर्यात करून दरवर्षी सुमारे 5000 कोटींची निर्यात केली जाते. त्यामुळे ऑर्डिनन्स फॅक्टरीतील युद्धसाहित्याच्या दर्जाबद्दल असा प्रश्न उपस्थित होणे कोणत्याही स्वरूपात परवडणारा नाही.

लष्कराने मंत्रालयाला एक अहवालही सोपवला आहे. यात टी-72 आणि टी-90 तसेच अर्जुन रणगाड्यांशी संबंधित दुर्घटनांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय 105 एमएम इंडियन फील्ड गन, 105 एमएम लाईटफील्ड गन, 130 एमएम एमए1 मिडियम गन आणि 40 एमएम एल-70 एअर डिफेन्स गनचाही उल्लेख केलेला आहे. दोष असलेल्या शस्त्रांमुळे अगदी सैनिकांच्या जखमी होण्याच्या घटनांचाही उल्लेख या अहवालात आहे. निकृष्ट शस्त्र पुरवठा केल्याबद्दल ऑगस्ट 2017मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय. सप्टेम्बर 2017मध्ये लाँग रेंज अल्ट्रालाईट होवित्झर (युएलएच) एम-777 या तोफेची पोखरण येथे चाचणी घेण्यात येत होती. त्यावेळी स्फोट झाला होता. निकृष्ट दारूगोळ्यामुळे हा स्फोट झाल्याचे त्यावेळी लष्कर आणि अमेरिकन उत्पादक कंपनीने स्पष्ट केले होते.

संरक्षण खात्यानेही हे पत्र व या अहवालाची गंभीर दखल घेऊन यापुढे शस्त्रांस्त्रांमध्ये त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत असे बजावले आहे.
दुसरीकडे लष्कराच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने संमती दिल्यानंतर भारतीय लष्कराला अस्त्र-शस्त्रांचा पुरवठा केला जातो. निर्धारित प्रयोगशाळेत त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आणि लष्कराला पुरवठा करण्यापूर्वी त्यांचे सर्व प्रकारचे परीक्षण करण्यात आले, असे ओएफबीने सांगितले आहे. आमची भूमिका केवळ दारूगोळ्याच्या उत्पादन आणि पुरवठ्यापर्यंतच मर्यादित आहे. लष्कराकडून या दारूगोळ्याचा साठा कसा केला जातो, हाताळणी कशी केली जाते याला आम्ही जबाबदार नाही आणि दारूगोळ्यातील त्रुटी व अपघातांसाठी हेही कारणीभूत आहेत, असे ओएफबीने म्हटले आहे.

यातील सत्य काय असो ते असो, परंतु हा लाखो सैनिकांच्या जीवाशी खेळ आहे आणि देशाची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे. विशेषतः सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत तो अजिबात खपवून घेता येणार नाही. त्यामुळे त्याचा लवकरात लवकर सोक्षमोक्ष लागणे आवश्यक आहे.

Leave a Comment