या भूमिकांनी मिळवून दिली माधुरीला ‘सुपरस्टार’ म्हणून ओळख


‘अबोध’ नामक फारशी प्रसिद्धी न मिळू शकलेल्या चित्रपटाद्वारे ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले असले, तरी त्यानंतर काही वर्षांनी प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटातील ‘मोहिनी’च्या भूमिकेने माधुरीला खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आणले. त्यानंतर पुढील अनेक वर्षे माधुरीने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारून ती ‘बॉलीवूड क्वीन’ असल्याचे निर्विवादपणे सिद्ध केले. उत्तम अभिनय, आणि कुशल नृत्यकला यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली ही सौंदर्यवती, गुणी अभिनेत्रीने १५ मे रोजी वयाची बावन्न वर्षे पूर्ण केली आहेत. उत्तम अभिनेत्री सोबतच एक मनमिळावू व्यक्ती म्हणूनही माधुरीचा लौकिक आहे. माधुरीच्या सोबत ज्या कलाकारांनी आजवर काम केले, त्या सर्वांशी माधुरीचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले. सर्वांशी चांगले वर्तन आणि मनमोकळा स्वभाव यामुळे माधुरीच्या सहकलाकारांच्या मनामध्ये माधुरीबद्दल सदैव प्रेम आणि आदराची भावना राहिली आहे. माधुरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्याला एकतीस वर्षांचा काळ उलटून गेला आहे. तिच्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये तिने अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण त्यापैकी काही खास भूमिकांनी तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले.

१९८८ साली आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटाने माधुरीला रातोरात सुपरस्टार बनविले. या चित्रपटामध्ये माधुरी नायिकेच्या, तर अनिल कपूर नायकाच्या भूमिकेमध्ये दिसले. या चित्रपटातील ‘एक, दो, तीन’ या गाण्याने प्रसिद्धीचे सर्व विक्रम मोडले. फिल्मफेअर पुरस्कारांसाठी हा चित्रपट तब्बल बारा श्रेणींतील पुरस्कारांसाठी नामांकित गेला होता. या चित्रपटासाठी माधुरीचे नाव ही सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून नामांकित केले गेले होते. १९८९ साली आलेल्या ‘प्रेम प्रतिज्ञा’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी माधुरीला त्यावर्षी सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्फेअर पुरस्कार मिळाला. १९९० साली आलेल्या माधुरी आणि आमिर खानच्या ‘दिल’ या चित्रपटाने त्याकाळी ‘सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट’ असा लौकिक मिळविला. या चित्रपटासाठी माधुरीला पुन्हा एकदा फिल्फेअरच्या वतीने सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कृत करण्यात आले.

१९९१ साली संजय दत्त, सलमान खान आणि माधुरी अभिनीत ‘साजन’ हा चित्रपटही खूप लोकप्रिय ठरला. तर १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेटा’ या चित्रपटाने त्या वर्षी सर्वाधिक कमाई केली. या चित्रपटासाठीही माधुरीला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कृत करण्यात आले. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ या चित्रपटातील माधुरीची भूमिका दर्शकांनी पसंत केली, आणि हा चित्रपटही त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटासाठीही माधुरीला सर्वोत्तम अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकित केले गेले.

१९९४ साली प्रदर्शित झालेल्या माधुरी-सलमानच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने प्रसिद्धीचे सर्वच विक्रम मोडले. या चित्रपटाला पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या चित्रपटासाठी माधुरीलाही सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘मृत्युदंड’ चित्रपटातील माधुरीची भूमिका अतिशय गाजली आणि त्या भूमिकेसाठी माधुरीला ‘स्क्रीन’ तर्फे सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून पुरस्कृत करण्यात आले. १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाने अमाप लोकप्रियता मिळविली. या चित्रपटातील माधुरी, शाहरुख आणि करिष्मा कपूर या तिघांच्याही भूमिका प्रेक्षकांची मने जिंकून गेल्या. या चित्रपटासाठीही माधुरीला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ चित्रपटातील माधुरीच्या भूमिकेला खूप लोकप्रियता लाभली. हा चित्रपट फ्रांस येथे ‘कान्’ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाच राष्ट्रीय पुरस्कारांच्या सोबत अकरा फिल्फेअर पुरस्कारही मिळाले.

Leave a Comment