माढ्यातील सलुनवाल्याची अफलातून पाटी सध्या चर्चेचा विषय


सोलापूर : आजवर आपण अनेक दुकानांमध्ये गिऱ्हाईकांनी उधारी मागू नये म्हणून आज रोख उद्या उधार, उधारी बंद आहे अशा पाट्या आपण पाहिल्याच असतील पण माढ्यातील एका सलुनवाल्याने दुकानातील उधारी बंद व्हावी यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. सध्या सोशल मीडियात त्याच्या दुकानात लावलेली पाटीची चर्चा होत आहे.

राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद, अशी पाटी माढा शहरातील सचिन जेन्टस पार्लरमध्ये मालकाने लावली आहे. अनेक लोक कुतुहलापोटी या पाटीमुळे या दुकानात गर्दी करत आहेत. तसेच दाढी केल्यानंतर, केस कापल्यानंतर रोख पैसे देणे लोकांनी सलूनवाल्याला सुरु केले आहे. या पाटीबाबत सचिन सांगतो की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा मी चाहता आहे. ही पाटी लावण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा उद्देश नाही. केवळ दुकानातील उधारीचे व्यवहार बंद व्हावेत यासाठी ही पाटी मी लावली आहे.

सचिन म्हणाला की, सर्वच बाजारपेठा नोटबंदी आणि सध्याच्या दुष्काळामुळे ठप्प झाल्या आहेत. अशा परिस्थितीत जगणे मुश्किल झाल्याने उधारी बंद करण्यासाठी मला हे ‘राहुल अस्त्र’ वापरावे लागले आहे. या पाटीमुळे माझ्या 60 टक्के उधाऱ्या बंद झाल्या आहेत. सचिन म्हणाला की, बाजारातील पैशांचा तुटवडा राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर कमी होईल, बाजारात पुन्हा पैसे फिरायला लागतील, त्यानंतर मी पुन्हा उधारी सुरु करेन.

Leave a Comment