दीपिका पादुकोणची एवढी आहे ब्रँड व्हॅल्यू!


सध्या आपल्या देशातील सर्वात मोठा सेलिब्रिटी ब्रँड असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही साहजिकच शाहरूख खान, सलमान खान वा आमिर खान यापैकी कुणाचे ही नाव घ्याल. पण सध्या भारताची सर्वात मोठी सेलिब्रिटी ब्रँड ही अभिनेत्री दीपिका पादुकोण असून तिच्या मागोमाग भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली याचे नाव आहे.

ही ताजी आकडेवारी सेलिब्रिटी ब्रँडच्या ब्रँड व्हॅल्यूवर लक्ष ठेवणारी डफ आणि फेल्पस या कंपन्यांनी जारी केली असून १० कोटी डॉलर म्हणजे ७०० कोटी रूपयांवर दीपिका पादुकोणची ब्रँड व्हॅल्यू पोहोचली आहे. दीपिकाची गतवर्षीची सर्वाधिक कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या फोर्ब्सच्या यादीत कमाई ११३ कोटी रूपये असल्याचे म्हटले आहे. दीपिकाने ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत क्रिकेटपटू एमएस धोनी, अभिनेता आमिर खान आणि पती रणवीर सिंग अशा सगळ्यांना मागे टाकले आहे.

वेगवेगळ्या २१ उत्पादनांची गतवर्षांत दीपिकाने ब्रँड अ‍ॅम्बेसीडर म्हणून काम केले. एवढ्या उत्पादनांची जाहिरात करणारा दुसरा कुठलाही फिल्मी अभिनेता वा अभिनेत्री नाही. केवळ क्रिकेटपटू विराट कोहली तिच्या जवळपास पोहोचू शकतो. आता स्टार्टअपमध्ये आपल्या वाढत्या ब्रँड व्हॅल्यूसोबत दीपिकाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. दीपिकाने फर्निचर आणि ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता ड्रम फूड्स इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड या सुप्रसिद्ध फ्रेंच कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी एपिगेमिया हा योगर्ट ब्रँड चालवते.

Leave a Comment