२०४० सालापर्यंत होणार कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत ५३ टक्क्यांनी वाढ


कर्करोग हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. एकीकडे जिथे काही प्रकारचे कर्करोग अतिशय जटील स्वरूपाचे असून, त्यांवर रोग संपूर्ण बरा होईल अशा उपचार पद्धतींवर अजूनही अनेक संशोधने सुरु आहेत, तिथे कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये मात्र दिवसेंदिवस भर पडत आहे. एका सर्वेक्षणाच्या अनुसार ज्या वेगाने कर्करोग रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता जगभरामध्ये या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुमारे एक लाख वैद्यकीय तज्ञांची आवश्यकता असणार आहे.

याच सर्वेक्षणानुसार २०१४ सालापर्यंत कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या आतापेक्षा ५३ टक्क्यांनी वाढणार असून, सुमारे दीड कोटी रुग्णांना एका वर्षामध्ये केमोथेरपी देण्याची आवश्यकता भासणार आहे. हा धक्कादायक आकडा, लांसेट ऑन्कोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जर्नलमध्ये सादर केल्या गेलेल्या रिपोर्टनुसार २०१८ पासून २०४० पर्यंत दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सलग वाढ दिसून येत असून, या सर्व रुग्णांना केमोथेरपीची आवश्यकता असणार आहे.

लांसेट ऑन्कोलोजी जर्नल ऑस्ट्रेलियातील सिडनीमधील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले असून, कर्करोगावर सातत्याने संशोधन करीत असलेल्या अनेक संशोधकांच्या मतांवर आधारित हा रिपोर्ट आहे. या संशोधकांच्या मते कर्करोगाचे वाढते प्रमाण हा जागतिक चिंतेचा विषय असून, या वर निश्चित उपचारपद्धती शोधली जाणे अत्यंत आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment