बरे झाले बाबा, आम्ही भारतीय आहोत!


भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश मानला जातो. आजही भारताचा समावेश विकसनशील देशांमध्ये केला जातो, विकसित देशांमध्ये नाही. अशा या विकसनशील देशात अनेक समस्या आहेत आणि लोकांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. तरीही भारतीय लोक दुर्दम्य आशावादाने या कठीण परिस्थितीवर मात करतात आणि हसतमुखाने समस्यांना सामोरे जातात. या उलट संपन्न समजल्या जाणाऱ्या देशांमधील लोक मात्र निराशेच्या गर्तेत जातात.

अलीकडेच एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या पाहणीतून ही गोष्ट समोर आली आहे. बहुतांश युरोपीय देशांतील लोक स्वतःच्या भविष्याबद्दल निराशावादी आहेत, असे या सर्वेक्षणात आढळले आहे. विकसित देशांमध्ये सर्वात निराशावादी लोक युरोपमध्ये आहेत, असेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. आपली राष्ट्रीय भूमिका, आपली युवा पिढी आणि एकूण जगाबद्दल निराश असल्याचे या देशांतील लोकांचे म्हणणे आहे.

यूगोव्ह-केंब्रिज ग्लोबलिझम प्रोजेक्टद्वारे हे सर्वेक्षण दरवर्षी केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणात जगातील 23 मोठ्या देशांमध्ये हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले. यात जीवनमानाचा दर्जा, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्यसेवा, शिक्षण, समुदाय आणि पृथ्वीच्या भविष्याबद्दल लोकांची मते अजमावण्यात आली.

युरोपमधील फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, स्पेन, स्वीडन, इटली, डेन्मार्क आणि पोलंड या आठ देशांतील लोकांची मते या सर्वेक्षणात घेण्यात आली. या देशांमध्ये एकत्रित मिळून युरोपियन महासंघातील तीन-चतु्र्थांश लोकसंख्या राहते. तेथील लोकांनी आपल्या राष्ट्राच्या भवितव्यातील मोठ्या प्रमाणात नैराश्यजनक मते व्यक्त केली. सुमारे दोन-तृतीयांश फ्रेंच नागरिकांनी आपल्या देशाच्या भविष्याबद्दल थोडेफार किंवा अत्यंत निराशावादी असल्याचे सांगितले, तर 13 टक्के जणांनी आशावादी असल्याचे सांगितल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये तर निराशावादी लोकांची संख्या अर्ध्याहून अधिक होती, तर इटाली व स्पेनमधील अर्ध्या लोकांनी निराशावादी मते व्यक्त केली.
त्या तुलनेत जर उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांची तुलना केली तर तेथील लोक अधिक आशावादी आहेत, असे सर्वेक्षणात दिसून आले. चीनमध्ये 81 टक्के लोक भविष्याबद्दल आशावादी आहेत, तर 73 टक्के भारतीय आणि 73 टक्के इंडोनेशियन लोक आशावादी असल्याचे हा अहवाल सांगतो.

या महिन्याच्या शेवटी युरोपीय महासंघाच्या संसदीय निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आला असून त्यातून युरोपीय मतदारांमध्ये तुटलेपणाची व तुच्छतेची भावना दिसून येते, असे अहवालात म्हटले आहे. युरोपीय संसदेची गेल्या पाच वर्षांची कारकीर्द ही इतिहासातील सर्वाधिक कसोटीची होती. याच काळात युरोपीय देशांमध्ये कर्जाचे संकट आणि शरणार्थ्यांची समस्या उभी राहिली. त्याचेही प्रतिबिंब या अहवालात पडले आहे.

एक प्रकारे आपण भारतीय असल्याबद्दल धन्य वाटावे, असेच हा अहवाल आहे. युरोपीय देशांनी 17व्या व 18व्या जगभरात साम्राज्य उभे केले आणि 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत विविध देशांची लूट केली. त्यात भारतही होता. मात्र 1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपल्यापासून युरोपीय देशांचे स्थान घसरत गेले आहे आणि त्यातूनच हे नैराश्य आले आहे, असेही म्हणता येईल. याच्या उलट भारतासारख्या देशाने स्वातंत्र्यानंतर भरारी घेतली आहे.

“भारत आणि चीन या देशांसाठी गेली 50 वर्षे ही प्रचंड विकासाची ठरली आहेत. त्यातून लाखो लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आज युरोप ज्या स्थितीत आहे, त्यापासून ते अत्यंत दूर असले तरी ते पुढे जात आहेत,” असे युरोपियन काऊन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे बर्लिन कार्यालयप्रमुख जोसेफ जानिंग यांनी गार्डियन या वृत्तपत्राला सांगितले. याच कारणांमुळे जगाबद्दल युरोपीय लोकांना संशय वाटतो, असे ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या अहवालात पाकिस्तानी लोक भारतापेक्षा जास्त आनंदी असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानच्या तुलनेत भारत अनेक बाबतीत किती तरी पुढे असूनही या बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले होते. त्याचे कारणही बहुदा हेच असावे. तरीही भारतासाठी यूगोव्ह संस्थेचा अहवाल आनंदाची एक झुळूक घेऊन येण्यास हरकत नाही. प्रत्यक्ष महासत्ता असलेल्या देशांमधील लोक निराशावादी आणि महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या देशातील लोक मात्र आशावादी, हेही एक सकारात्मक चित्रच आहे!

Leave a Comment