भारतातील पहिला दृष्टीहीन न्यूज रीडर- श्रीरामानुजम


दृष्टी नसूनही श्रीरामानुजम सारख्या लोकांचे भविष्य उज्ज्वल आहे. आपल्याला दृष्टी नाही, त्यामुळे आपण इतरांसारखे सामान्य आयुष्य जगू शकत नाही असे म्हणत न राहता श्रीरामानुजम याने आपले आयुष्य सत्कारणी लावण्याचा निश्चय केला. धैर्य आणि जिद्दीच्या जोरावर आज श्रीरामानुजम दृष्टीहीन असूनही इतर कोणापेक्षा तसूभरही कमी नाही. आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलत श्रीरामानुजम याने मोठ्या जिद्दीने आपल्या ध्यायाकडे वाटचाल सुरु ठेवली आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. आजच्या काळामध्ये श्रीरामानुजम केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वप्रथम दृष्टीहीन न्यूज रीडर म्हणून ओळखला जात आहे. तमिळ नाडूमध्ये जन्मलेल्या श्रीरामानुजमच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या डोळ्यांनी संपूर्ण जग आपण पाहू शकत नसलो, तरी संपूर्ण जगाने आपल्याकडे पाहावे, आपली दखल घ्यावी ही श्रीरामानुजमची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.

वयाने केवळ चौदा वर्षांचा श्रीरामानुजम जन्मापासूनच दृष्टीहीन आहे. पण त्याची दृष्टीहीनता त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड येऊ शकली नाही. लहानपणापासून श्रीरामानुजमला न्यूज रीडर बनण्याची इच्छा होती. अलीकडेच श्रीरामानुजमने कोईम्बतूर येथील ‘लोटस न्यूज’ या वृत्तवाहिनीवरून बावीस मिनिटांसाठी वृत्तवाचन केले. या वृत्तवाचनाचे थेट प्रक्षेपण केले गेले. श्रीरामानुजम अंधशाळेमध्ये शिक्षण घेत असून, ब्रेल लिपीच्या सहाय्याने विशेष बातम्यांचे वृत्तवाचन करीत असतो. पहिल्याप्रथम वृत्तावाचन करताना घाबरून गेलेला श्रीरामानुजम आता मात्र वृत्तवाचनामध्ये तरबेज झाला असून, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषय, क्रीडा आणि मनोरंजनात्मक वृत्तवाचन करीत असतो.

Leave a Comment