हा आहे आजच्या युगातील श्रावण बाळ


आजच्या काळामध्ये जिथे तरुण पिढीला आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांशी चार शब्द निवांत बोलण्याइतका वेळही मोठ्या मुश्किलीने मिळतो, तिथे कैलाश गिरी ब्रह्मचारी सारखे कोणी पहावयास मिळणे दुर्मिळच. कैलाश गिरी वीस वर्षांचे असताना त्यांच्या आईने चार धाम यात्रेला जाण्याची इच्छा बोलून दाखविली. आईची इच्छा पूर्णत्वाला नेण्याचा निर्णय कैलाशने तत्क्षणी घेतला आणि वयाच्या चोविसाव्या वर्षी आपल्या आईला चार धाम यात्रा करविण्यासाठी कैलाशने घर सोडले. या गोष्टीला वीस वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. आता कैलाश पन्नाशीला आला आहे. गेल्या वीस वर्षांच्या काळामध्ये आपल्या आईसह कैलाशने ३६,००० किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला आहे. आपल्या आईकरिता आपण इतके तर नक्कीच करू शकत असल्याचे कैलाशचे म्हणणे आहे.

आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी कैलाशच्या मनामध्ये आजही ताज्या आहेत. वयाच्या आठव्या वर्षी झाडावरून पडल्याने कैलाशचा पाय मोडला. घरी अठरा विश्वे दारिद्र्य आणि रोजच्या जेवणासाठीही पुरेसे पैसे गाठीशी नसलेल्या कैलाशला हॉस्पिटलमध्ये जाऊन मोडलेल्या पायावर औषधपचार करवून घेणे शक्यच नव्हते. त्यावेळी कैलाशच्या आईने, कीर्ती देवीने त्याची अविरत सेवा केल्याने कैलाशचा पाय पूर्ण बरा झाला. किंबहुना कैलाश पूर्ण बरा झाला, तर आपण चार धामची यात्रा करू असा नवस कीर्ती देवींनी केला होता. कीर्ती देवींची प्रार्थना देवाने ऐकली आणि कुठल्याही औषधोपचाराच्या शिवाय कैलाश संपूर्ण बरा झाला. पण त्यानंतर काही ना काही कारणे अशी उत्पन्न होत गेली, की कीर्ती देवींचा चार धाम यात्रेचा नवस फेडणे टळत गेले.

कैलाश जेव्हा चोवीस वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी आपल्या आईला चार धामांपैकी एकेका धामाला नेण्यास सुरुवात केली. ज्याप्रमाणे श्रावण बाळाने आपल्या आईवडिलांना कावडीमध्ये बसवून यात्रा केली, त्याचप्रमाणे कैलाशदेखील कीर्ती देवींना कावडीमध्ये बसवून, ही कावड आपल्या खांद्यांवर तोलत यात्रा करीत असतात. कावडीमधील एका टोपलीत कीर्ती देवी, तर दुसऱ्या टोपलीमध्ये कपडे, औषधे, काही भांडी इत्यादी गरजेच्या वस्तू ठेऊन कैलाशचा प्रवास सुरु असतो. दररोज सकाळी साडेसहाच्या सुमारास कैलाशची पदयात्रा सुरु होते, आणि दुपारपर्यंत पाच ते सहा किलोमीटर अंतर कैलाश पार करतात. दुपारच्या वेळी थोडी विश्रांती घेऊन, उन्हे कलली की कैलाशची पदयात्रा पुन्हा सुरु होते. दिवस मावळला, की दोघे मायलेक एखाद्या रस्त्यालगतच्या शेतामध्ये किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये रात्रीचा मुक्काम करतात.

लोकांकडून भिक्षेमध्ये मिळालेल्या शिध्यातून कैलाश भोजन तयार करतात, आणि स्वतः जेवण्यापूर्वी आपल्या दृष्टीहीन आईला पोटभर जेऊ घालतात. चार धाम यात्रेसोबतच भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा या माता-पुत्राने केली आहे. त्यामध्ये रामेश्वरम, जगन्नाथ पुरी, तिरुपती, गंगासागर, बसुकीनाथ धाम, बद्रीनाथ, केदारनाथ, अयोध्या, काशी, चित्रकुट, पुष्कर इत्यादी स्थानांचा समावेश आहे. सध्या आग्रा-मथुराच्या परिसरामध्ये असलेले कैलाश आपल्या यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. यानंतर मध्य प्रदेशातील जबलपूरजवळ असलेल्या वार्गी या गावी परतण्याची त्यांची इच्छा आहे. कैलाश यांचा उल्लेख अनेक जण आजच्या युगातील श्रावण म्हणून करीत असले, तरी कैलाशला ही तुलना तितकीशी पटत नाही. त्या उलट त्यांच्याकडून प्रेरणा घेत आजच्या पिढीने आपल्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले, तर त्याचे समाधान आपल्याला अधिक होणार असल्याचे कैलाश म्हणतात.

Leave a Comment