कर्नाटकात चाहूल नव्या नाट्याची


लोकसभा निवडणूक अजून संपलीही नाही की देशाच्या एका महत्त्वाच्या राज्यात नवीन राजकीय नाट्याची चाहूल लागत आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) संयुक्त सरकार असून या सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एक प्रकारे राज्यातील सरकार शेवटच्या घटका मोजत आहेत की काय, अशी परिस्थिती आहे.

कर्नाटकात लोकसभेचे मतदान पार पडले असले तरी कुंदगोळ आणि चिंचोली या दोन मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्यासाठी येत्या सोमवार व मंगळवारी मतदान होणार असून त्याचा प्रचारही सुरू आहे. या दोन्ही जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्या आपल्याकडे राखण्यासाठी काँग्रेस इरेचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकारच्या पहिल्या दिवसापासून मिठाचा खडा पडलेल्या काँग्रेस-जेडीएसच्या युतीचे अस्तित्व या प्रचारात नाही. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि जेडीएसचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी मित्रपक्ष काँग्रेसपासून अंतर राखले आहे. त्यामुळे त्यांनी प्रचारापासून दोन हात दूर राहणे पसंत केले आहे.

आता तर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी उपचाराच्या नावाखाली एका रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे. देवेगौडा पिता-पुत्रांनी उडुपी येथे एका आयुर्वेद उपचार रिसॉर्टमध्ये मुक्काम ठोकला आहे. तेथे देवेगौडांनी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. त्यामुळे ही खरोखरच प्रकृतीची काळजी की नवीन राजकीय समीकरणांची नांदी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची महत्त्वाकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. सिद्धरामय्या यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांनी सुरू केली आहे. गृहमंत्री एम. बी. पाटील, चिक्काबल्लापूरचे आमदार डॉ. के. सुधाकर आणि इतर काही आमदारांनी सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून आणखी एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ सिद्धरामय्या यांच्यात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावर खुद्द सिद्धरामय्या यांनी त्यांना गप्प केले आणि मुख्यमंत्रीपद रिकामे नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगितले. हीही एक राजकीय चालच होती.

याला कारण झाले तर सिद्धरामय्या आणि कुमारस्वामी यांच्यातील संघर्ष. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जागा द्याव्यात, अशी शिफारस सिद्धरामय्या यांनी केली होती. ती डावलून कुमारस्वामी यांनी त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे खवळलेल्या सिद्धरामय्या यांनी संधी पाहून एक आठवड्याच्या आत आपल्या समर्थकांकरवी नेतृत्वबदलाची मागणी करवून घेतली. त्याला उत्तर म्हणून जेडीएस नेत्यांनी चमचागिरी या शब्दात या सर्व प्रकरणाची संभावना केली.

सत्ताधारी आघाडीत हा बेबनाव वाढत असतानाच राज्यात आपले सरकार आणण्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न सुरूच आहेत. येत्या 23 मे रोजी सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होताच कर्नाटकातील युती सरकार पडेल, अशी चर्चा जोरात सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनी तर त्याचा मुहूर्तसुद्धा काढून ठेवला आहे. भाजपने आपले ऑपरेशन कमळ आतापर्यंत थांबविलेले नाही. काँग्रेसचे नेते रमेश जार्किहोळी यांच्यासह 20 आमदार भाजपमध्ये येण्यास तयार असल्याचे भाजप नेते येडियुरप्पा यांनी नुकतेच वक्तव्य केले होते. काँग्रेस आणि जेडीएसचे अनेक आमदार भाजपमध्ये सामील होण्यास तयार असल्याचे येडियुरप्पा यांनी अनेकदा सांगितले आहे.

एकुणात पाहिले तर कर्नाटकात सरकार आता जाते की नंतर, अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात सत्तांतर घडेल, अशी सर्वांची अटकळ आहे. त्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहेत. तसे झाले नाही तर किमान विधानसभेच्या निवडणुका तरी पुन्हा होतील, अशी शक्यता आहे. काँग्रेसचे नेते असलेल्या उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांना तर पत्रकार परिषद घेऊन आपला पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. युतीचे हे सरकार आपला पाच वर्षांचा मुदत पूर्ण करेल, असा दावा त्यांनी केला. तूर्तास तरी त्या दाव्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.

Leave a Comment