आघाडी सरकारसाठी मोदी तयार?


लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पा पार पडले आहेत आणि लोकशाहीचा महोत्सव मानला जाणारे हे पर्व आता शेवटाकडे चालले आहे. येत्या आठवड्याभराच्या आत संपूर्ण मतदान पार पडेल आणि देशात पुढील सरकार कोणाचे येईल, याचा साधारण अंदाजही येईल. सध्याचे सरकार टिकविण्यासाठी भारतीय जनता पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे आणि आपणच सत्तेत परतू, असा आत्मविश्वासही त्या पक्षाचे नेते व्यक्त करतात. मात्र याच धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे आश्चर्य निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. किंबहुना भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, असे वाटून आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यास मोदी तयार झाले आहेत का, असा प्रश्नही त्यामुळे निर्माण झाला आहे.

शनिवारी, म्हणजे 11 मार्च रोजी, गुजरात भाजपच्या ट्विटरवरील अधिकृत खात्यावरून मोदी यांच्या नावाने हे ट्वीट करण्यात आले. त्यात मोदींनी म्हटले आहे, की “आघाडी सरकार चालविण्याची कला भाजपला चांगलीच अवगत आहे आणि मी स्वतः भाजप संघटनेत काम करताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपच्या सहयोगी पक्षांसोबत काम केले आहे. अटलबिहारी वाजपेयीजींनी आघाडीचे सरकार उत्तमरीत्या चालवून दाखविले आणि त्यांचा वारसाही आमच्या पक्षाकडे आहे.”

तसे तर हे एक निव्वळ राजकीय ट्वीट म्हणावे लागेल परंतु त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसण्याचे कारण म्हणजे युती व आघाडीच्या विरोधात मोदींनी सातत्याने घेतलेली भूमिका. निवडणूक प्रचारात मोदींनी सातत्याने विरोधी पक्षांच्या युतीला धोपटले आहे. विरोधकांचे महागठबंधन हे महाठगबंधन आहे इथपासून महामिलावट आहे, इथपर्यंतची टीका त्यांनी केली होती. विरोधी नेत्यांपैकी प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचे आहे, असे त्यांनी सातत्याने म्हटले आहे. मजबूत देश हवा असेल तर एकाच पक्षाला बहुमत द्या आणि त्यातही भाजपला बहुमत द्या, असे त्यांनी आवाहन केले आहे.

ज्या सरकारकडे स्पष्ट बहुमत नसते ते चांगले काम करू शकत नाही, त्यामुळे युती नकोच, असे मोदींचे मत आहे. त्यांच्या या मतावर टीकाही झाली होती. कारण भाजपची वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या पक्षांसोबत युती सरकार आहेत. महाराष्ट्रात भाजपची शिवसेनेशी युती आहे, तर बिहारात जदयूसोबत. या दोन्ही ठिकाणी युतीची सरकारे आहेत. गोव्यात तर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार अगदी खिचडी सरकार म्हणावे असे आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी अशा चार-पक्षांच्या आधाराने ते सरकार चालू आहे. ईशान्येतील काही राज्यांमध्येही भाजप आघाडी सरकारमध्ये सामील आहे. काश्मिरमध्ये तर काही काळ भाजपने पूर्णपणे विरोधी असलेल्या पीडीपी पक्षासोबत युती करून सरकार चालवले. शिवाय स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी सहा वर्षे यशस्वीपणे 22 पक्षांचे सरकार चालवले, हे संपूर्ण जगाला माहीत आहे.

असे असले तरी मोदींनी आपल्या विरोधकांना महामिलावट म्हणून एकहाती बहुमताची याचना मतदारांकडे करणे सुरू ठेवले होते. मात्र पाचव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर अचानक मतपरिवर्तन करून त्यांनी अशी आघाडी सरकारची आठवण करून द्यावी आणि त्यात भाजप कुशल असल्याचे इंगित करणे, हे अर्थपूर्ण आहे.

कारण लोकसभा निवडणुकीत आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, हे भाजपने वारंवार म्हटले आहे. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही तसा दावा केला. खुद्द मोदी यांनी फिर एक बार मोदी सरकारची हाक दिली आहे. आज तेच अचानक युती, आघाडी व गठबंधनची गोष्ट करत आहेत. त्यामुळे मोदींना स्वतःला भाजपला एकहाती बहुमत मिळणार नाही, याची चाहूल लागली आहे का, अशी शंका अनेकांनी घेतली आहे. कदाचित त्याचा अर्थ असाही होऊ शकतो, की भाजप वास्तववादी बनला आहे आणि आता त्याचे पाय जमिनीवर आले आहे. याचे कारण म्हणजे यंदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट नाही आणि कोण जिंकणार हे कळणे खरोखर अवघड बनले आहे.

यंदा निवडणुकीत लाटही नाही आणि मतदानाचा पॅटर्नही खूप अस्पष्ट आहे. काही ठिकाणी भरघोस मतदान झाले आहे, तर काही ठिकाणी अत्यल्प मतदान झाले आहे. भाजपचे गड मानले जाणाऱ्या राज्यांतही मतदानाचे प्रमाण सरासरीच राहिले आहे – फारही नाही आणि कमीही नाही.
मतदानाच्या या अस्पष्टतेमुळेच निकालांचा अंदाज वर्तविणेही कठीण झाले आहे आणि आघाडी सरकारची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातूनच पुढच्या काळाची बेगमी म्हणून मोदी यांनी हे वक्तव्य केले असल्यास नवल नाही. आघाडी सरकारसाठी आपण तयार असल्याचे म्हणूनच त्यांनी संकेत दिले आहेत.

Leave a Comment