रुग्णाच्या कानातून निघाला चक्क जिवंत कोळी !


चीनमध्ये घडलेल्या एका अजब, चित्तथरारक घटनेचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, दर्शकांना भयचकित करणारी अशी ही घटना आहे. या घटनेमध्ये एका रुग्णाच्या कानामध्ये पाण्याचा फवारा मारला असता, एक जिवंत कोळी रुग्णाच्या कानातून बाहेर आल्याचे दिसत आहे. या घटनेची सविस्तर हकीकत अशी, की ली नामक एका मनुष्याच्या कानामध्ये सतत खाज सुटू लागली. सुरुवातीला लीने याकडे दुर्लक्ष केले, पण पाहता पाहता ही खाज इतकी वाढली, की वैद्यकीय उपचार घेण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. ली डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचा कान खाजत आहे याचे कारण स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टर्सही थक्क झाले.

सुरुवातीला लीच्या कानामध्ये खाज का सुटत आहे हे डॉक्टर्सना ही समजेना. पण लीच्या कानामध्ये मायक्रोस्कोपच्या सहाय्याने निरीक्षण केले गेले असता, काहीच वेळाने लीच्या कानामध्ये असलेला जिवंत कोळी डॉक्टर्सना दिसला. डॉक्टर्सच्या मतानुसार हा कोळी लीच्या कानामध्ये काही काळ वास्तव्य करून होता, हे त्या कोळ्याने लीच्या कानामध्ये विणेलेल्या असंख्य जाळ्यांवरून स्पष्ट होत होते. हा कोळी आकराने लहान असला, तरी त्याला चिमट्याच्या सहाय्याने पकडून बाहेर काढण्याचे प्रयत्न असफल ठरले.

अखेरीस लीच्या कानामध्ये सलाईन सोल्युशन भरून त्यानंतर पाण्याचा फवारा कानामध्ये मारल्यानंतर तो कोळी लीच्या कानातून बाहेर काढण्यात डॉक्टर्सना यश आले. ही सर्व प्रक्रिया व्हिडियो चित्रीकरणाद्वारे चित्रित करण्यात आली असून हा व्हिडियो सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच ली प्रमाणे कान खाजण्याची तक्रार इतर कोणाच्या बाबतीत उद्भविल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचा सल्लाही डॉक्टर्सनी या व्हिडियोद्वारे दिला आहे.

Leave a Comment